Shirur News : शिरूर : शिरुर तालुक्यातील म्हसे येथे बिबट्याने महिलेवर जीवघेणा हल्ला केला. महिलेने प्रसंगावधान दाखवून प्रतिकार करत, बिबट्याच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली. दैव बलवत्तर म्हणून महिला या प्रसंगातून वाचल्याची प्रतिक्रीया परिसरातून व्यक्त करण्यात येत आहे. या धक्कादायक घटनेनंतर बिबट्या की माणूस, हा संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे.
म्हसे परिसरात बिबट्याची दहशत असल्याने ग्रामस्थांनी वन विभागाकडे वेळोवेळी पिंजरे लावण्याची मागणी केली. परंतु वन विभागाने अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही. बिबट्याच्या हल्ल्यात माणसे मृत्युमुखी पडल्यावर वन विभागाला जाग येणार का, अशी संतप्त प्रतिक्रीया ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. येथील ग्रामस्थ सध्या बिबट्याच्या दहशतीखाली जगत आहेत.
वनविभागाच्या सुस्त कारभारामुळे नागरिक संतप्त
म्हसे येथे टाकळी हाजी रस्त्यावर राहात असलेल्या तुळसाबाई गंगाराम मुसळे या महिलेवर शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बाजरीच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. या महिलेने डोक्याला स्कार्प बांधला होता. (Shirur News) त्यामुळे डोक्याला पंजाची जखम झाली. मात्र, दैव बलवत्तर म्हणून ही महिला थोडक्यात वाचली. महिलेला तत्काळ शिरूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
ही घटना घडल्यानंतर घटनास्थळी तत्काळ घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गावडे यांनी धाव घेतली. तेथून वन अधिकारी जगताप यांच्याशी संपर्क साधून, बिबट्याच्या संरक्षणासाठी परिसरात पिंजरा लावण्याची मागणी त्यांनी केली. या वेळी बोलताना येथील ग्रामस्थांनी सांगितले की, या वस्तीवर रोजच बिबट्या दिसत असून, आतापर्यंत बिबट्याने चार-पाच शेळ्या, बकऱ्यांचा फडशा पाडला आहे. (Shirur News)
मात्र, संपूर्ण बकरी न सापडता केवळ अवशेष सापडत असल्याने वन विभागाकडून पंचनामा केला जात नाही. त्यामुळे नुकसानभरपाई देखील मिळत नाही, अशी व्यथा मिना शाखा कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष प्रकाश वायसे, पुणे जिल्हा भष्ट्राचार व मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष दत्ता मुसळे, अध्यक्ष सोनभाऊ मुसळे, अध्यक्ष रोहिदास मुसळे, बबन मुसळे , संदीप मुसळे यांनी व्यक्त केली. बिबट्यांचा महिलेवर हल्ला होऊनही वन विभाग पिंजरा लावण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. जनतेने न्याय मागायचा तरी कोणाकडे, असा सवाल व्यक्त होत आहे.
घोड व कुकडी नदीच्या काठावरील म्हसे गावासह डोंगरगण, शिनगरवाडी, आमदाबाद, निमगाव दुडे, दुडेवाडी, तामखरवाडी, टेमकरवाडी, वडनेर, सरदवाडी, माळवाडी, जांबुत, फाकटे, चांडोह, पिंपरखेड, कवठे येमाई, चांडोह परिसरात उसाचे क्षेत्र झपाट्याने वाढल्याने बिबट्यांना राहण्यासाठी सुरक्षित जागा आहे. (Shirur News) त्यामुळे मोठ्या प्रमाणात बिबट्यांची संख्या वाढत आहे. जांबुत, पिंपरखेड येथे वेगवेगळ्या घटनांमध्ये बिबट्यामुळे चार जणांना प्राण गमवावा लागला. मात्र, त्यानंतरही या परिसरात ना शेतीसाठी विज आली, ना बिबट्यासाठी नवीन पिंजरे उपलब्ध झाले, त्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या जीवाशी वन विभाग खेळत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
याबाबत भिमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम म्हणाले की, या परिसरामध्ये बिबट्यांची वाढली असून, पशुधनाबरोबरच मनुष्य प्राण्यावर हल्ले वाढले आहेत. शाळेत येताना ऊसाच्या शेतामधून रस्ता असून, विद्यार्थ्यांना बिबट्यांच्या हल्ल्याची भिती वाटत आहे. (Shirur News) शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळावी, याबाबत सरकार कोणतीच हालचाल करत नाही. वन विभाग बिबट्याचा बंदोबस्त करत नाही. यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. वनविभागाने त्वरित या परिसरातील गावांमध्ये बिबट मार्गदर्शन व पिंजरे लावावेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : शिरूर तालुक्यातील म्हसे येथे महिलेवर बिबट्याचा हल्ला..