रांजणगाव गणपती: गणेगाव खालसा, ता.शिरुर येथे ऊसतोडणी मजूराच्या पत्नीचा दोरीच्या साहाय्याने गळा आवळून खून करुन फरार झालेल्या तिच्या पतीला मूळ गावी दंडपिंपरी, ता.चाळीसगाव येथून अटक करण्यात आली. त्याला शिरुर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती रांजणगावचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली.

माऊली उर्फ ज्ञानेश्वर आत्माराम गांगुर्डे, रा.दंडपिंपरी, ता चाळीसगाव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे, तर मिलाबाई ज्ञानेश्वर गांगुर्डे वय 27 असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा भाऊ ताराचंद सुखलाल गोरे, रा.गणेगांव खालसा, मूळ रा. सिद्धवाडी, ता.चाळीसगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन 11 फेब्रुवारी रोजी घडलेल्या घटनेबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक येथील आपल्या नातेवाईकाच्या लग्नास जाण्यासाठी नकार दिल्याचा राग मनात धरुन आरोपी माऊलीने त्याची पत्नी मिलाबाई हिचा दोरीने गळा आवळून खून केल्यानंतर आरोपी फरार झाला होता. आरोपी मोबाईल वापरत नसल्याने शोध घेणे रांजणगाव पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पोलिस निरीक्षक वाघमोडे यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी तीन वेगवेगळी पथके तयार केली.

त्यानंतर पोलिसांनी वेशांतर करुन आरोपी गांगुर्डे याला बुधवारी(12 मार्च) त्याच्या मूळ गावी दंडपिंपरी,ता. चाळीसगाव येथे त्याला शिताफिने ताब्यात घेत अटक केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिवाजी मुंडे करत आहेत.








