पुणे: हगवणेला पळून जाण्यासाठी मदत करण्याऱ्या चौंधे कुटुंबातील सुनेचा हुंड्यासाठी छळ होत असल्याची माहिती उघडकीस आली आहे. धक्कादायक माहितीसमोर आल्यानंतर पुण्यातील हुंडाबळीचे आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे. सुयश चौंधे यांच्या पत्नी धनश्री चौंधे यांनी आरोप केला आहे की, त्यांचा पती, दिर, सासरे आणि सासू यांनी हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केला. धनश्री चौंधे यांनी या प्रकरणी पोलिस आणि राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती, परंतु कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असे धनश्री चौंधे यांनी सांगितले आहे. धनश्रीने छळाला कंटाळून आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला होता. लग्नात दोन लाख रुपये हुंडा आणि दोन तोळे दिल्यानंतरही सासरच्यांकडून पैशांची मागणी सुरूच होती. २० लाख रुपयांच्या हुंड्यासाठी शारिरीक आणि मानसिक छळ करण्यात आल्याचे धनश्रीने सांगितले आहे.

सासू वैशाली आई गावची उपसरपंच होत्या. त्यांनी अनेक निवडणुका लढल्या आहेत. त्यामुळे प्रकरण दाबण्यात आले असल्याचे समोर आले आहे. धनश्री चौंधे यांनी त्यांचा पती सुयश चौंधे यांच्यावर गंभीर आरोप करत सांगितले कि, सुयश चौंधे हा बळजबरी ब्लू फिल्म दाखवून शारीरिक संबंध ठेवत असल्याचा आरोप धनश्रीने केला आहे. धनश्रीने सासू वैशाली चौंधे यांच्यावरही काळी जादू करत असल्याचा आरोप केला आहे. सुयश चौंधे आणि त्याचा भाऊ संकेत चौंधे सासू वैशाली यांच्या समोरच गांजाचे सेवन करतात, असाही आरोप महिलेने केला आहे.

धनश्री चौंधेने शितल उभे नावाच्या महिलेबद्दल धक्कादायक खुलासा करत सांगितले कि, ती मुली पुरवते, दरम्यान, सुयश चौंधे आणि त्याचा भाऊ संकेत चौंधे हे दोघेही दारू पिऊन शितल उभेला सांगून आवडेल ती मुलगी घेऊन फिरत असे, हा प्रकार रोजचा असल्याचे धनश्रीने सांगितले. धनश्रीने सासरच्यांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.







