यवत: यवत येथील विद्या विकास मंदिर विद्यालयातील सन २०१०- ११ या वर्षातील इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच मोठ्या उत्साहात, दिमाखात तसेच पावसाच्या वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंग्रजी विषयाचे माजी शिक्षक एस.एन.जाधव हे होते. या स्नेह मेळाव्यासाठी विद्या विकास मंदिर विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक सुभाष पोमण सर,माजी मुख्याध्यापक दादा मासाळ , शिक्षक विष्णू बडे , आंदगाव शाळेचे मुख्याध्यापक सतीश सावंत, शिक्षक एस बी जाधव, शिक्षिका विशाखा जगताप, मंगल कुदळे ,भूपेंद्र शहा, प्रकाश भोसले यांसह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

तब्बल पंधरा वर्षाच्या कालावधीनंतर प्रथमच या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ४० ते ४५ विद्यार्थ्यांनी या स्नेह मेळाव्यास हजेरी लावली होती. तब्बल तीन दिवस सलग पाऊस सुरू असल्याने शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी खूप कसरत करावी लागली.

सकाळी सर्वांनी एकत्रित येत राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत गाऊन शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत वर्गामध्ये प्रवेश केला.
यावेळी उपस्थित शिक्षकांचा विद्यार्थ्यांकडून शाल, श्रीफळ व फुलाचे रोप भेट देऊन सन्मान करण्यात आला. सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपला परिचय करून देत शाळेत असतानाचे आठवलेले अनेक किस्से आणि शाळेत असताना आलेले अनुभव, शिक्षक तसेच मित्रांसोबतचे अनेक प्रसंग, केलेल्या शिक्षा अशाप्रकारे विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.पंधरा वर्षानंतर पहिल्यांदाच काहीजण भेटत असल्याने त्या भेटण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होता. सकाळी शाळेतील कार्यक्रम झाल्यानंतर कार्यक्रमात सर्व शिक्षकांनी पंधरा वर्षानंतर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना आपल्या शैलीत मार्गदर्शन केले.
याप्रसंगी अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला व या आठवणी नव्याने पल्लवीत झाल्या. त्यावेळी शिक्षणाचे धडे गिरवलेल्या दहावीच्या वर्गात आपापल्या बाकावर बसण्याची संधी या स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा प्राप्त झाली. शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांची आठवणींची जणू मैफिलच यावेळी रंगली होती.
यावेळी शिक्षक ,विद्यार्थी विद्यार्थिनी डोक्यावर फेटे व रंगीबेरंगी पोशाख परिधान केल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. शाळेतील कार्यक्रम संपल्यानंतर दुपारी सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी भांडगाव येथील यवत २४ रिसॉर्टला उत्कृष्ट अशा जेवणाचा आस्वाद घेतला तर
विद्यार्थ्यांनी विविध खेळांचा मनमुराद आनंद लुटला. अनेक वर्षांनी भेटल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि समाधान पाहायला मिळाले. दरम्यान सायंकाळी कार्यक्रमाची आठवण म्हणून प्रत्येक सदस्याला एक फुलाचे रोप भेट म्हणून देण्यात आले स्नेह मेळाव्याची सांगता झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीर्ती चलंबत्ते यांनी केले तर आभार स्वप्निल खुटवड यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी सागर दोरगे, चेतन ढवळे, प्रतीक दोरगे , गणेश शिंदे, गणेश रणदिवे ,अविनाश लोंढे यांनी विशेष प्रयत्न केले.
शाळेला पाण्याची टाकी भेट
आपण ज्या शाळेत शिकलो, घडलो त्या शाळेचे आपण काहीतरी देण लागत त्या दृष्टीने प्रेरित होऊन माजी विद्यार्थ्यांच्या वतीने विद्या विकास मंदीर विद्यालयास भेट म्हणून शाळेला 2000 लिटर ची पाण्याची टाकी भेट दिली.तसेच भविष्यात शाळेला कोणतीही अडचण आल्यास त्यासाठी मदत करू असे विद्यार्थ्यांनी आश्वासन दिले.







