नाशिक : नाशिकमधील हायवेलगत एका जोडप्याला भर पावसात दोन तरुणांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या हल्ल्यामध्ये जबर जखमी झालेल्या तरूणाचे रोहित गोरडे असे नाव आहे. रोहित याला लाकडी दांड्याने डोक्यावर तरुणांकडून वार करण्यात आले आहेत . या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, इंदिरानगर बोगद्याजवळ जुन्या वादातून या जोडप्यावर तरुणांकडून सशस्त्र हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. भर पावसात महिला जीवाच्या आकांताने ओरडत होती.पोलिसांना फोन लावा रे… शेवटचं माफ करा अशी गयावया मारहाण करणाऱ्यांना करत होती. मात्र ते काही ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नव्हते. त्यातील एक जण तर मारहाण करत असताना दुसऱ्याला दगड आणायला लावत होता. रोहित गोरडे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या मारहाणप्रकरणी
मयुरी गोरडे यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये दीपक कपिले आणि दिगंबर उर्फ दत्ता आंधळे यांनी मारहाण केल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणाचा वरिष्ठ निरीक्षक संतोष नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

दरम्यान, दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात जीवे मारण्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामध्ये दोन महिलांसह विधानसभा निवडणूक लढवलेल्या शरद पवार गटाच्या नेत्याच्या नातेवाइकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.







