मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने “आज दो बजे बॉम्ब ब्लास्ट होनेवाला है मुंबई एअरपोर्ट पर” अशाप्रकारे खोटी माहिती दिली. पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीचा नंबर तात्काळ ट्रेस केला.अधिक तपासात पोलिसांना हा फोन साकीनाकातून मनजीत कुमार गौतम नावाच्या व्यक्तीने केल्याचे समोर आले. याप्रकरणी त्याला ताब्यात घेत आझाद मैदान पोलिसांनी त्याच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी देणाऱ्या मनजीत कुमार गौतम याला ताब्यात घेण्यात आले आहे. अंधेरी पूर्व साकीनाका येथे राहणाऱ्या मनजीतने सांगितले की,त्याचे बायकोशी भांडण झाले. त्यानंतर त्याने फेक कॉल करत मुंबई विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली.पोलिसांनी केलेल्या तपासात धमकीचा फोन हा अंधेरीतूनच आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर एमआयडीसी आणि सहार पोलिसांनी आरोपी मनजीतला अटक केली.

आरोपी पेशाने टेलर आहे. त्याला बीएनएस कलम १६८ अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे. मनजीत गौतम याच्याविरोधात आझाद मैदान पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास आणि कारवाई करण्यात येत आहे.







