विशाल कदम
लोणी काळभोर : पुणे-सासवड महामार्गावरील आळंदी ते पंढरपूर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील दिवे घाटात ठिकठिकाणी कचरा टाकला जात आहे. या घाटातील डाव्या बाजूला कचरा टाकल्याने या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. असे असताना प्रशासनाचे मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.
दिवेघाटात पसरलेल्या या घाणीमुळे हा मार्ग दुर्गंधीच्या विळख्यात अडकला आहे. या ठिकाणी कचऱ्याच्या ढिगांमध्ये वापरलेले हँडग्लोज, रक्तानं माखलेल्या सुया, रक्त-लघवीचे नमुने, तपासणीसाठी वापरलेल्या बाटल्या यांसारख्या गोष्टींमुळे घाटात असलेल्या वन्यजीवांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. यामुळे प्रशासनाने तातडीने या कचऱ्याची विल्हेवाट लावून घाट स्वच्छ करावा, अशी मागणी केली जात आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सासवड व जेजुरी मार्गे जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. असे असताना पालखी सोहळ्याच्या स्वागतालाच घाटात कचरा व घाणीच्या साम्राज्याने वारकरी व पालखी सोहळ्याचे स्वागत होणार की काय? हा प्रश्न सर्वांना सतावत आहे. दिवे घाटात अज्ञातांकडून सतत कचरा टाकला जातो. याच कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. या बाबीचा पंढरपूरकडे पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांना मोठा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कचऱ्यामुळे उद्भवू शकतो आरोग्याचा प्रश्न
दिवेघाटातील साचलेल्या कचऱ्यामुळे पर्यटकांसह प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. घाटातील वळणाच्या ठिकाणी पोल्ट्रीचे टाकाऊ साहित्य, खराब झालेली फळे-भाजीपाला, हॉटेलमधील विघटन न केलेला कचरा, मेलेल्या कोंबड्या, अंडी, प्लास्टिक पिशव्या, मृत जनावरं इतकेच नाहीतर दारूच्या बाटल्यांचा खच देखील मोठ्या प्रमाणात साचला आहे. त्यामुळे अशाच वस्तूंनी पालखीचे स्वागत होणार का? हा प्रश्न यानिमित्ताने विचारला जाऊ लागला आहे.
वारकऱ्यांसाठी गंभीर स्थिती
पुढील महिन्यात पालखीसोबतच हजारोंच्या संख्येने वारकरी येत आहेत. या वारकऱ्यांना व स्थानिक नागरिकांना मोठ्या साथीच्या आजारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालखी सोहळ्यात हे दृश्य योग्य नाही. त्यामुळे या परिस्थितीकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.
कचरा फेकणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करावी
दिवेघाट मार्गावर वाहनचालक असो किंवा इतर अज्ञात व्यक्ती त्यांच्याकडून घाट मार्गावरच कचरा फेकला जात आहे. परिणामी, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे विशेष लक्ष देऊन याची या ठिकाणी कचरा टाकणाऱ्यावर कडक कारवाई करावी आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली जात आहे.
दिवेघाट सह्याद्री पर्वत रांगेतील घाट
पुणे-सासवड महामार्गावरील दिवेघाट हा सह्याद्री पर्वत रांगेतील एक घाट आहे. वळणावळणाचा हा घाट चढून वर गेले की पुरंदर तालुका सुरू होतो. दिवेघाटाच्या पायथ्याला अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला तलाव आहे. या मार्गावर पुरंदर तालुक्यातील सासवड येथील संत सोपान काका समाधी, नारायणपूर येथील दत्त मंदिर, केतकावळे येथील बालाजी मंदिर, जेजुरी येथील खंडोबा मंदिर, भुलेश्वर मंदिर यासारखी देवस्थाने आहेत.