पुणे: महाराष्ट्राच्या राजकीय (Rupali Thombre) वर्तुळात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये असलेल्या (Ajit Pawar) अंतर्गत मतभेदांमुळे चांगलाच गदारोळ माजलेला आहे. या वादाला फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणानंतर सुरुवात झाली आणि त्याचे पडसाद थेट पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर आता उमटत आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर सडकून टीका केल्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रदेश प्रवक्त्या रूपाली पाटील ठोंबरे यांना पक्षाने अचानक प्रवक्तेपदावरून काढून टाकल्याने हा वाद अधिकच गडद झाला आहे.

फलटणमध्ये घडलेल्या महिला डॉक्टर आत्महत्येच्या घटनेनंतर रुपाली ठोंबरे यांनी माध्यमांपुढे रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांचा दावा होता की, पीडित महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर रुपाली चाकणकर यांनी तिचं चारित्र्यहनन केलं आणि असं वर्तन करणं हे एका जबाबदार पदावरील व्यक्तीला शोभणारं नाही. रुपाली ठोंबरेंच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली. त्यामुळे पक्षाने तत्काळ “कारणे दाखवा” नोटीस बजावून सात दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश दिले. त्या नोटीसमध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलं की, पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांविरोधात विविध माध्यमांसमोर केलेली वक्तव्ये ही पक्षशिस्तीचा भंग मानली जातील.
मात्र, त्या मुदतीत रुपाली ठोंबरे यांनी उत्तर देण्याआधीच पक्षाने आपला निर्णय घेतला. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर केली, आणि त्यात रूपाली ठोंबरे यांचे नाव वगळलं गेलं. या निर्णयानंतर रुपाली ठोंबरे यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे की, ठोंबरे आता इतर राजकीय पक्षप्रवेशाच्या पर्यायांचा विचार करत आहेत. माहितीनुसार, त्यांना काही पक्षांनी थेट संपर्क साधला गेला असून त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांचा पक्षाचा समावेश आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रुपाली ठोंबरे यांना आपल्या पक्षात येण्याचं आमंत्रण दिल्याचं सांगितले जात आहे. तर दुसरीकडे, मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटातील माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि ठोंबरे यांचे पूर्वीपासून चांगले राजकीय संबंध असल्याने शिंदे गट हा ठोंबरे यांच्यासाठी जवळचा पर्याय ठरू शकतो. काही सूत्रांनी तर भाजपकडूनही त्यांच्या हालचालींबद्दल रस दाखवण्यात आल्याचं म्हटलं आहे.
आगामी पुणे महानगर पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ठोंबरे यांच्या राजकीय पावलांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. स्थानिक गणितं आणि त्यांचा प्रभाव पाहता, त्या शिंदे गटात गेल्यास त्यांना संघटनात्मक बळ मिळू शकतं, असं निरीक्षकांचं म्हणणं आहे.
दरम्यान, रूपाली पाटील ठोंबरे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितलं, “मी अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे. प्रवक्तेपदावरून हटवल्यानंतर माझं अजित पवार दादांशी बोलणं झालं आहे. मी दोन दिवसांत त्यांची भेट घेणार असून ते न्याय करणारे नेते आहेत. माझ्यावर अन्याय होऊ देणार नाहीत, असा मला विश्वास आहे. काही पक्षांकडून ऑफर्स आल्या असल्या तरी सध्या मी पक्ष सोडण्याचा कोणताही विचार करत नाही.”
त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या ‘थांबा आणि पाहा’ अशी भूमिका दिसते. अजित पवार यांची भेट आणि त्यानंतर होणारा निर्णय हा पुढील राजकीय समीकरणांचा निर्णायक टप्पा ठरेल. ठोंबरे यांचं पुढचं पाऊल कोणत्या दिशेने पडतं, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.






