अक्षय टेमगिरे

रांजणगाव, १३ जुलै: शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती परिसरात शनिवारी पहाटे जबरी चोरीची घटना घडली. तीन अनोळखी इसमांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून कार अडवून तब्बल १ लाख ७७ हजार ६०० रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली. या प्रकरणी रांजणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अक्षय हनुमंत बोरगे (वय २६, रा. उलवे, ता. पनवेल, जि. रायगड) हे एम एच 12 डब्लु डब्लु 4050 क्रमांकाच्या आय ट्वेंटी वाहनाने रांजणगाव हद्दीतून जात असताना पहाटे साडेचारच्या सुमारास हॉटेल गार्गीसमोर ही घटना घडली. अनोळखी तीन इसमांनी अचानक कारचा दरवाजा उघडला व बोरगे यांना चाकूसारख्या धारदार शस्त्राचा धाक दाखवत जबरदस्तीने कारमधील ऐवज लुटून पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच रांजणगाव पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, उपनिरीक्षक शिवाजी मुंडे, उपनिरीक्षक अविनाश थोरात तसेच गुप्तहेर शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत तपास सुरू केला असून, आरोपींचा माग काढण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंडे करत असून, आरोपींचा लवकरच छडा लागेल अशी माहिती पोलीस निरीक्षक वाघमोडे यांनी दिली आहे.







