पुणे: हडपसर येथील डम्पिंग ग्राऊंडमुळे पुणे विमानतळावर येणाऱ्या-जाणाऱ्या विमानांना ‘बर्ड हिट’चा (पक्ष्यांच्या धडकेचा) धोका निर्माण झाल्याचा दावा करणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर सोमवारी (28 जुलै) या प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली.

काय आहे प्रकरण?
हडपसर येथील कचरा डेपो हा पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अखत्यारित येतो. येथे दररोज 800 ते 900 टन कचरा मोठ्या प्रमाणावर साठवला जातो. पुणे महानगरपालिकेनेही या ठिकाणी ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारा 200 टन क्षमतेचा प्रकल्प उभारला आहे. शिवाय, कचऱ्यापासून कंपोस्ट खत आणि इंधन (RDF) तयार करण्याचे प्रकल्पही इथे सुरू आहेत.

या कचरा डेपोमुळे विमानतळ परिसरात पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून, त्यामुळे विमान अपघाताची शक्यता बळावली आहे, असा दावा करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत डम्पिंग ग्राऊंड तात्काळ अन्यत्र हलवण्याची मागणी करण्यात आली आहे.

याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी कचरा डेपोमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर आणि संभाव्य विमान दुर्घटनेच्या धोक्यावर भर दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार, परिसरातील काही बेसन आणि मसाल्याच्या कंपन्यांमधून निघणाऱ्या कचऱ्यामुळेही पक्षी मोठ्या संख्येने आकर्षित होत आहेत.
महापालिका आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाचा विरोध:
या याचिकेला पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि पुणे महापालिकेने तीव्र विरोध केला आहे. त्यांनी याचिकाकर्त्यांचा हेतू योग्य नसल्याचा दावा करत, डम्पिंग ग्राऊंड हटवण्याची मागणी फेटाळून लावली. दोन्ही प्रशासनांनी डम्पिंगमुळे पक्ष्यांचा धोका वाढल्याचे आरोपही अमान्य केले.
सर्व पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर, न्यायालयाने या प्रकरणावरील निकाल राखून ठेवला आहे. आता न्यायालयाच्या अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







