महेंद्र शिंदे:

खेड शिवापूर, ता. १५ : शिवगंगा खोऱ्यात पावसाची संततधार सुरू झाल्याने भात लावणीच्या कामास वेग आला आहे. या परिसरात भात हे प्रमुख पीक असून, शेतकरी वर्गाने लावणीची लगबग सुरू केली आहे.
कल्याण, मोरदरी, रहाटवडे, कोंढाणपूर या गावांमध्ये भात लावणी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. योग्य वेळेत आणि भरपूर पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. शेतकरी आपल्या शेतात काम करत असून, नांगरणी, पाळी मारणे आणि रोप लावणी आदी प्रक्रिया उत्साहात पार पाडत आहेत.
पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्यामुळे यंदाचा भात उत्पादन चांगले होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी शासनाकडून योग्य सल्ला व मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.







