पुणे: पुण्यातील विमाननगर परिसरात (Pune Traffic Jam) सतत वाढणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय (Pune News) म्हणून एकमार्गी वाहतुकीचा प्रयोग अमलात आणला जात आहे. या उपाययोजनेमुळे प्रमुख चौकांमधील वाहतूक सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी तसेच सुरेंद्र पठारे फाउंडेशनने या भागातील वाढत्या वाहतूक कोंडीबाबत अनेकदा तक्रारी नोंदवल्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि फाउंडेशनचे प्रमुख सुरेंद्र पठारे यांनी विमाननगर, एअरपोर्ट रोड, येरवडा, नगररोड परिसर आणि खराडी बायपास चौक या ठिकाणी पाहणी करून आवश्यक उपायांवर चर्चा केली होती. (Breaking News)

गर्दीच्या वेळी वाहनांची मोठ्या प्रमाणात वाढ, चुकीचे वळण घेणे, रस्त्यांवरील अवैध पार्किंग, लेन शिस्त न पाळणे आणि पादचाऱ्यांना वाढलेला धोका यामुळे विमाननगर परिसरात वाहतूक व्यवस्थापन मोठे आव्हान बनले होते. रुग्णवाहिका आणि अन्य आपत्कालीन वाहने दीर्घकाळ कोंडीत अडकत असल्याने नागरिकांनी गंभीर चिंता व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर रहिवाशांनी वाहतूक पोलिसांशी चर्चा करत एकमार्गी वाहतुकीची योजना तयार केली असून गंगापूरम चौक ते गणपती मंदिर चौक हा रस्ता तसेच श्रीकृष्ण चौक ते सीसीडी चौक हा मार्ग एकमार्गी करण्यात आला आहे. या दोन मुख्य मार्गांदरम्यान असलेले मधील चौक आणि जोडरस्ते मात्र पूर्ववत दुहेरी वाहतुकीसाठी खुले ठेवण्यात आले आहेत, ज्यामुळे स्थानिक वाहतुकीला अडथळा येणार नाही.
दत्तमंदिर चौक आणि कैलास सुपर मार्केट चौक या प्रमुख वाहतूक केंद्रांदरम्यान दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी होते. कार्यालयीन वेळा आणि शाळा–कॉलेजच्या वेळेत या कोंडीत आणखी वाढ होते. त्यामुळे एकमार्गी वाहतूक योजनेमुळे प्रवासाचा वेळ कमी होईल आणि पादचाऱ्यांची सुरक्षितता वाढेल, असा दावा करण्यात येतो. या मोहिमेसाठी विवेक देओ, अनिता हनुमंते, श्याम कुद्याडी, बिनोद पिल्लई, पवन शर्मा, सोनू सिंह, विल्यम मायकेल आणि अश्विनी देसाई यांसह अनेक रहिवाशांनी सक्रिय सहभाग घेतला. वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनीही आवश्यक सहकार्य केले, तर सुरेंद्र पठारे फाउंडेशनने जनजागृती मोहीम राबविली.
हा एकमार्गी प्रयोग सध्या प्रायोगिक स्वरूपात सुरू असून पुढील काही दिवसांच्या निरीक्षणानंतर आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत. नागरिकांनी सहकार्य करावे आणि या योजनाविषयी काही सुचना असल्यास त्या पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस येथील कार्यालयात 17 नोव्हेंबर 2025 ते 01 डिसेंबर 2025 या कालावधीत लेखी स्वरूपात सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. अंतिम आदेश देताना नागरिकांच्या सूचनांचा विचार केला जाणार असून अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना वगळून वाहतूक व्यवस्थेची अंमलबजावणी करण्यात येईल.







