राहुलकुमार अवचट

यवत : यवत येथील डॉ. श्याम कोंडदेव कुलकर्णी यांचे बुधवार (दि. 08) रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले. यवत परिसरातील अपघातग्रस्त रुग्णांना जीवदान देणारे देवदूत म्हणून त्यांची ओळख होती. परिसरातील अनेक जण त्यांचा उल्लेख देवमाणूस असा करत असत. मात्र, डॉ. कुलकर्णी यांचे कार्य पाहता त्यांना केवळ देवमाणूस म्हणणेही अपुरे वाटते. माणसाला देवमाणूस बनवण्याचे संस्कार देणारे ते खरे देवदूत होते. त्यांच्या संस्कारातून घडलेले डॉ. समीर कुलकर्णी आजही त्याच निष्ठेने जनसेवा करत आहेत. रुग्णसेवा हा व्यवसाय नसून ती माणुसकीची सेवा आहे, हा विचार डॉ. श्याम कुलकर्णी यांनी समाजात रुजवला.
सातारा जिल्ह्यातील वाई येथील मूळ रहिवासी असलेले डॉ. कुलकर्णी 80 च्या दशकात यवत येथे स्थायिक झाले. त्यांनी स्वतःचे क्लिनिक सुरू करून तब्बल 55 वर्षांहून अधिक काळ यवत व पंचक्रोशीतील गरीब व गरजू रुग्णांची सेवा केली. अत्यल्प शुल्क, तेही शक्य असल्यास, या तत्त्वावर ते उपचार करत असत.

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस ते उरुळी दरम्यान अपघात झाल्यास जखमींना तत्काळ डॉ. कुलकर्णी यांच्या आनंद हॉस्पिटलमध्ये आणले जात असे. त्यांच्या उपचारांमुळे रुग्ण वाचेल, असा नातेवाईकांना ठाम विश्वास होता. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करून त्यांचा जीव वाचवणे हेच त्यांचे पहिले ध्येय असे. “आधी जीव वाचवा, नंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करा” हा त्यांचा मूलमंत्र होता. कुलकर्णी मेडिकल फाउंडेशन आणि सुश्रुषा नर्सिंग कॉलेजच्या माध्यमातून त्यांनी अनेक कुटुंबांना आधार दिला.

दौंड येथील पिरॅमिड हॉस्पिटल आणि यवत येथील आनंद हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी दीर्घकाळ रुग्णसेवा केली. सेवाभावी वृत्ती, सामाजिक जाण आणि सर्वांना मदत करण्याची तयारी यामुळे ते सर्वांच्या मनात घर करून होते.
अनेक अपघातग्रस्तांसाठी देवदूत ठरलेले हे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याने यवत परिसरात न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
‘गरीबांचे व अपघातग्रस्तांचे डॉक्टर’ म्हणून ओळख असलेल्या डॉ. श्याम कुलकर्णी यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा डॉ. समीर कुलकर्णी, सून आणि नाती असा परिवार आहे.
डॉ. श्याम कुलकर्णी यांच्या पार्थिवावर आज दुपारी 3 वाजता यवत येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.







