Neelam Shinde : अमेरिकेत कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटीत इंजिनिअरिंगमध्ये एमएसच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेणारी साताऱ्यातील एका तरुणीची दीर्घ संघर्षानंतर झालेली मृत्यूची बातमी अनेकांना अस्वस्थ करून गेली आहे. कराडजवळील उमरज येथील 35 वर्षीय नीलम शिंदे ही अभियांत्रिकीच्या उच्च शिक्षणाच्या अंतिम वर्षात होती. 14 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या भीषण अपघातानंतर ती तब्बल 1 वर्ष कोमात होती. अखेर 28 मार्च 2026 रोजी तिची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली.

या घटनेमागील पार्श्वभूमी अत्यंत वेदनादायक आहे. आईच्या पहिल्या पुण्यतिथीनंतर अवघ्या 2 दिवसांनी नीलम नेहमीप्रमाणे संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडली होती. त्याच वेळी भरधाव वाहनाने तिला जोरदार धडक दिली. या अपघातानंतर तिला सॅक्रामेंटो येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र ती शुद्धीवर आली नाही.
कुटुंबासाठी हा काळ अत्यंत कठीण ठरला. 69 वर्षीय वडिलांना परदेशात जाण्यासाठी परवानगी मिळवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अखेर प्रयत्नांनंतर ते मुलीला भेटण्यासाठी गेले, पण तिची प्रकृती सुधारली नाही. आर्थिक, मानसिक आणि भावनिक ताण सहन करत कुटुंबीयांनी आशा सोडली नव्हती.
मंगळवारी कॅलिफोर्निया येथील ‘माउंट व्हर्नन मेमोरियल पार्क’मध्ये तिचे मोजके नातेवाईक आणि मित्रांनी हिंदू रितीरिवाजांनुसार तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. नीलमच्या निधनानंतर तिच्या वडिलांनी घेतलेला निर्णय मात्र समाजासाठी प्रेरणादायी ठरला. त्यांनी तिची त्वचा आणि नेत्रपटल दान करण्यास तत्काळ संमती दिली. या निर्णयामुळे इतरांना नवे आयुष्य मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा, अपघातानंतरची आरोग्यव्यवस्था, तसेच कुटुंबांवर येणारा आर्थिक आणि मानसिक ताण याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. त्याचबरोबर अवयवदानाबाबत जागरूकता वाढवण्याचीही ही वेळ आहे. नीलमची कहाणी ही केवळ एका अपघाताची नाही, तर संघर्ष, आशा आणि शेवटी समाजासाठी दिलेल्या अमूल्य देणगीची आहे.







