Pune : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याचे पत्र मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पुरंदर तालुक्यातील खानवडी येथील कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकार त्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेईल, असेही स्पष्ट केले.

खानवडी येथील कार्यक्रमात फडणवीस यांनी महात्मा फुले यांच्या द्विशताब्दीनिमित्त सुरू करण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सीबीएसई शाळा उभारण्यात आली असून, सीएसआर निधीतून विविध प्रयोगशाळा उभारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विद्यार्थिनींसाठी सायकली उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती दिली. महात्मा फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याबाबत राज्य सरकारने प्रस्ताव पाठविल्याचेही त्यांनी नमूद केले.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी त्यांना कोणतेही आमंत्रण आले नसल्याचे सांगितले. या संदर्भात महाविकास आघाडी स्तरावर निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, उपमुख्यमंत्र्यांच्या मृत्यूबाबत कर्नाटकात गुन्हा दाखल झाल्याचा उल्लेख करत सुळे यांनी चौकशीबाबत प्रश्न उपस्थित केले. दुर्घटना स्थळावरून मोबाईल सापडल्याचा उल्लेख करत ब्लॅक बॉक्स संदर्भातही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. या प्रकरणात इतर पाच मृत व्यक्तींनाही न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.







