Pune : नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अवघं राज्य उत्साहात सज्ज झालं आहे आणि पुणेकरांचा जोश तर विचारायलाच नको. ३१ डिसेंबर जवळ येताच कुणी कुटुंबासोबत बाहेर जाण्याचे प्लॅन करतंय, तर कुणी मित्र-मैत्रिणींसोबत पार्टीची तयारी करतंय. हॉटेल्स, रिसॉर्ट्स, क्लब्समध्ये बुकिंग फुल्ल असून, 2024 ला निरोप देत 2025 चं दणक्यात स्वागत करण्याची तयारी जोरात सुरू आहे.

यातच पुणेकरांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा ३१ डिसेंबरची रात्र आणखी खास ठरणार आहे. कारण थेट पहाटेपर्यंत पार्टी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
पहाटे ५ वाजेपर्यंत पार्टीला मुभा
थंडीच्या गुलाबी हवेत पुणेकरांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच पुणे पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने ‘गुड न्यूज’ दिली आहे. २४ डिसेंबर (नाताळ पूर्वसंध्या), २५ डिसेंबर (नाताळ) आणि ३१ डिसेंबर या तीन दिवसांमध्ये शहरातील पब, बार, क्लब आणि रेस्टॉरंट्स थेट पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
इतकंच नाही, तर वाईन शॉप्सही रात्री १ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. म्हणजे यंदा पुण्यातल्या पार्ट्या अक्षरशः पहाटेपर्यंत रंगणार, हे नक्की!
पण आचारसंहितेची करडी नजर
सेलिब्रेशनचा मूड असला तरी राज्यात २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून कडक आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे यंदा फक्त पोलिसच नाही, तर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकांचीदेखील शहरभर गस्त असणार आहे.
नियम तोडाल तर कारवाई ठरलेली
पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, वेळ वाढवून मिळाली म्हणून नियम धाब्यावर बसवता येणार नाहीत. मद्यपानासाठी अधिकृत परवाना (Permit) बाळगणं बंधनकारक असेल. विना परवाना पार्टी किंवा मद्यविक्री केल्यास थेट कारवाई केली जाईल.
ड्रंक अँड ड्राईव्हवर कडक कारवाई
दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांची यंदा खैर नाही. शहरात जागोजागी नाकाबंदी केली जाणार असून ड्रंक अँड ड्राईव्हविरोधात विशेष मोहीम राबवली जाणार आहे.
म्हणून पुणेकरांनो, नव्या वर्षाचं स्वागत करताना मनसोक्त नाचा, गाणी ऐका, सेलिब्रेट करा… पण नियमांचं भान ठेवा. नाहीतर ३१ च्या रात्रीचा आनंद, थेट पोलिसांच्या कारवाईत बदलायला वेळ लागणार नाही!







