पुणे: “बारामतीकरांचं शरद पवारांवर प्रेम आहे तसंच त्यांच्यावर माझंही प्रेम आहे” असे वक्तव्य करून (Pune Politics) अजित पवारांनी आपल्या (Ajit Pawar) कार्यकर्त्यांना घड्याळाच्या (Sharad Pawar) चिन्हाभोवती एकत्र यायचा संदेश दिला. या विधानानंतर बारामतीनंतरचा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये महाविकासआघाडीतील घटक पक्षांमध्ये हालचाली वाढल्या. पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी गटांना एकत्र आणण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी आधीच प्रस्ताव पाठवला आहे. मात्र या प्रस्तावावर निर्णय होण्याआधीच ठाकरे सेना आणि काँग्रेसने शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या उपस्थितीत स्पष्ट केले की कोणत्याही परिस्थितीत ते अजित पवारांसोबत आघाडी करणार नाहीत. राज्यात किंवा कोल्हापुरात पवार काका-पुतणे एकत्र आले तरी पिंपरी चिंचवडमध्ये हा प्रयोग होणार नाही, अशी ठाम भूमिका दोनही पक्षांनी घेतली. त्यांना हवं असल्यास हे शरद पवार गटालाही विचारून पाहा, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, विदर्भातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कधी काळी भाजप आणि काँग्रेसची आघाडी झाली होती, हा इतिहास दाखवत शरद पवार गटाने काँग्रेस आणि ठाकरे सेनेकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याचा आग्रह कायम ठेवला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पवार काका-पुतणे एकत्र येण्याच्या शक्यतांनी वेग घेतल्याने महाविकासआघाडीच्या स्थानिक बैठकीत मोठी चर्चा झाली. या हालचालींचे राजकीय पडसाद आगामी काळात कसे उमटतील आणि स्थानिक समीकरणांवर त्याचा किती परिणाम होईल, याकडे आता शहरातील सर्वच पक्षांचे लक्ष लागले आहे.







