Pune News : पुण्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या मोठ्या अपघातानंतर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला. या निर्णयाने अपघाताचे प्रमाण कमी होईल असा अंदाज प्रशासनाला आहे. कात्रज–देहूरोड बायपासवरील भूमकर चौक ते नवले पूल या भागातील वेगमर्यादा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. आधी या रस्त्यावर ताशी 60 किमी वेगाची मर्यादा होती, ती आता ताशी 30 किमी करण्यात आली आहे. हा नवा नियम 25 नोव्हेंबरपासून लागू होत असून, त्यामुळे अपघात कमी व्हावेत अशी अपेक्षा आहे. (Pune News) मात्र यामुळे वाहतूक कोंडी वाढेल, अशीही चिंता व्यक्त होत आहे. हा भाग उताराचा असल्यामुळे आणि सतत वर्दळ असल्यामुळे आधीपासूनच अपघातांसाठी ओळखला जातो.

सीसीटीव्ही आणि स्पीडगनने थेट कारवाई होणार
नवले पुलावर अलीकडेच झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला होता. (Pune News) त्यानंतर पोलिसांनी हा कठोर निर्णय घेतला आहे. आता वेगमर्यादा पाळली नाही तर सीसीटीव्ही आणि स्पीडगनने थेट कारवाई होणार आहे.
तरीही काही अडचणीही समोर येऊ शकतात. उतार जास्त असल्याने वाहनांचा वेग आपोआप वाढतो. ट्रक आणि ट्रेलरसारखी मोठी वाहनं ताशी 30 किमी वेग कायम ठेवू शकतील का, याबाबत शंका आहे. (Pune News) इतक्या कमी वेगामुळे वारंवार ब्रेक लावावे लागतील, ज्यामुळे ब्रेक गरम होणे किंवा निकामी होणे, तसेच वाहनाचा ताबा सुटणे असे धोके वाढू शकतात. त्यामुळे कोंडीही वाढू शकते, असं वाहनचालकांचे म्हणणे आहे.
वाहतूकदार महासंघाचे डॉ. बाबा शिंदे यांनी सांगितलं की, “वेग कमी करणं योग्य आहे, पण उतार, जड वाहतूक आणि वाहनांच्या मर्यादा लक्षात घेतल्यास काही नवे धोकेही वाढू शकतात. (Pune News) या रस्त्यावर दीर्घकालीन अभियांत्रिकी बदल आणि वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा आवश्यक आहेत.”
अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी मात्र स्पष्ट केलं की, “ताशी 30 किमी ही वेगमर्यादा तीव्र उताराच्या भागात नाही. फक्त शहराशी जोडलेल्या भागातच ही मर्यादा लागू केली आहे. तिथे उतार नाही. (Pune News) पुढे सेवा रस्ते आणि इतर सुविधा तयार झाल्यानंतर परिस्थिती सुधारेल.” तसेच, वेगमर्यादेबाबत काही सूचना असतील तर त्या नक्की कळवाव्यात, असंही त्यांनी सांगितलं.







