पुणे: आगामी पुणे महापालिका (Pune News) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Pune Voters List) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) बावधन आणि कोथरूड प्रभागातील मतदारयादीची पडताळणी केली असता मोठा घोळ उघड झाला असल्याचा दावा केला आहे. मनसेने या प्रभागातील तब्बल 1,158 मतदारांची नावे दुबार, तिबार आणि काही ठिकाणी चार वेळा नोंदवली गेल्याचा आरोप केला आहे. इतकेच नव्हे तर या मतदारयादीत कन्नड आणि गुजराती भाषेत नोंदवलेली नावेही असल्याने मतदारांची अचूक ओळख पटवणे कठीण झाले आहे, असे मनसेचे म्हणणे आहे.

मनसे सरचिटणीस बाळा शेडगे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाचा तपशील मांडला. यावेळी मनसे कामगार सेनेचे उपाध्यक्ष नरेंद्र तांबोळी, कोथरूड विभाग सचिव राजेंद्र वेडे-पाटील, शहर संघटक प्रशांत मते, शहर सचिव संजय भोसले, उपविभाग अध्यक्ष महेश लाड आणि शहर सचिव रमेश जाधव उपस्थित होते.

शेडगे म्हणाले, “बावधन-कोथरूड प्रभाग खडकवासला, कोथरूड आणि भोर-मुळशी विधानसभा मतदारसंघात येतो. या प्रभागातील 1,158 मतदारांची नावे मतदारयादीत दोन ते चार वेळा नोंदवण्यात आली आहेत. काही प्रकरणांमध्ये मतदारांचे पत्ते देखील सारखेच आहेत. तसेच काही मतदारांची नावे कन्नड आणि गुजराती भाषेत असल्यामुळे त्यांची ओळख पटविणे अवघड झाले आहे.”

ते पुढे म्हणाले, “दुबार नावे नोंदवली जाणे हे सामान्य आहे, पण या वेळी एकाच मतदाराचे छायाचित्रदेखील तेच असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी मतदाराचे नाव वेगवेगळ्या प्रकारे लिहिले गेले असले तरी तेच व्यक्ती असल्याचे स्पष्ट होते. पडताळणीदरम्यान खडकवासला, भोर आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये अशा अनेक नावे आढळली, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता धोक्यात आली आहे.”
याप्रकरणात मनसेने पुणे महापालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त आणि सध्या ‘महाऊर्जा’चे महासंचालक असलेले ओमप्रकाश बकोरिया यांचे नावही दोन वेगवेगळ्या मतदारसंघात भोर आणि खडकवासला नोंदवले असल्याचा दावा केला आहे. “मतदारयादीत जर सनदी अधिकाऱ्यांची नावेच दुबार नोंदवली जात असतील, तर सामान्य नागरिकांनी या यादीवर विश्वास ठेवायचा कसा?” असा सवाल शेडगे यांनी उपस्थित केला.
या संपूर्ण प्रकारामुळे निवडणूक यंत्रणेच्या अचूकतेवर आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मनसेने निवडणूक आयोगाकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करून चुकीची नावे तात्काळ वगळण्याची मागणी केली आहे.







