Pune : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे मध्यरात्री सुमारे 12:25 वाजता भारतीय हवाई दलाच्या (IAF) एका फायटर विमानाच्या तांत्रिक बिघाडामुळे विमानसेवा काही काळासाठी विस्कळीत झाली. लँडिंगदरम्यान विमानाच्या अंडरकॅरेजमध्ये बिघाड झाल्याने विमान धावपट्टीवर अडकले आणि रनवे तात्पुरता बंद करण्यात आला.

या घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव सर्व नागरी उड्डाणे थांबवण्यात आली. विमानतळ प्रशासन, एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) आणि हवाई दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक माहितीनुसार ही तांत्रिक बिघाडाची घटना असून कोणताही अपघात झाल्याची पुष्टी करण्यात आलेली नाही.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. विमानातील सर्व एअरक्रू सुरक्षित असून नागरी मालमत्तेचेही नुकसान झालेले नाही, अशी अधिकृत माहिती देण्यात आली. काही काळ अपघाताची शक्यता व्यक्त करण्यात आली होती, मात्र ती नाकारण्यात आली.
रात्रभर दुरुस्तीचे काम करण्यात आले आणि धावपट्टीवरील अडथळा दूर करण्यात आला. विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी परिस्थिती सुरळीत होण्यासाठी 4 ते 5 तास लागण्याची शक्यता व्यक्त केली होती. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगितले.
Pune runway is temporarily unavailable due to an incident involving an IAF aircraft. The aircrew are safe and there is no damage to civil property. Efforts are underway to operationalise the runway and resume normal operations at the earliest.@DefenceMinIndia@SpokespersonMoD…
— Indian Air Force (@IAF_MCC) April 17, 2026
धावपट्टी दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर सकाळी 7:30 पासून डिपार्चर फ्लाइट्स सुरू करण्यात आल्या, तर सकाळी 8:00 पासून आगमन सेवा सुरू करण्यात आली. विमानसेवा हळूहळू पूर्ववत होत असून दिवसभरात ती पूर्णपणे सुरळीत होण्याची शक्यता आहे.







