यवत, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावर चालत्या बसमधून एका बड्या व्यावसायिकाची तब्बल 11 लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्याने अत्यंत शिताफीने चोरल्याची घटना उघडकीस आली. जमीन खरेदी करण्यासाठी ही रक्कम घेऊन हा व्यावसायिक खाजगी ट्रॅव्हल्सने नवी मुंबईहून आंध्र प्रदेशकडे निघाला होता. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सोमवारी (ता. 18) नऊ वाजून 20 मिनिटांनी कासुर्डी (ता. दौंड) गावचे हद्दीतील पुणे सोलापूर हायवे रोडचे कडेला असलेल्या दिल्ली दरबार ढाबा येथे हि घटना घडली. याबाबत कोम्मिनेनी श्रीनिवास राव वय 44 वर्षे व्यवसाय हॉटेल रा. फेंटनं. 1202 विंग ए कलिष्टा अपार्टमेंट प्लॉट नं. 158 सेक्टर नं. घनसोली नवी मुंबई) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कोम्मिनेनी राव हे एका जमीन खरेदीच्या व्यवहारासाठी आपल्यासोबत 11 लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन निघाले होते. या रकमेमध्ये 500 रुपयेच्या तब्बल 2 हजार 300 नोटा होत्या. त्यांनी वाशी येथून विजयवाडा (आंध्र प्रदेश) येथे जाण्यासाठी ‘विक्रम ट्रॅव्हल्स’ या लक्झरी स्लीपर बसचे तिकीट बुक केले होते. त्यांनी ही सर्व रोकड आपल्या जवळील एका पिवळ्या रंगाच्या प्रवासी बॅगेत सुरक्षित ठेवली होती.

हायवेच्या कडेला असलेल्या ‘दिल्ली दरबार’ ढाब्यापाशी बस आली असता, प्रवासादरम्यान कोणाचेही लक्ष नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने फिर्यादी श्रीनिवास राव यांच्या सीटजवळ ठेवलेली पिवळ्या रंगाची बॅग अलगद लांबवली. काही वेळानंतर आपली पैशांची बॅग चोरीला गेल्याचे लक्षात आले. सर्वत्र शोधली असता ती मिळून आली नाही.

दरम्यान, या प्रकरणी चोरीप्रकरणी श्रीनिवास राव यांनी यवत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस हवालदार काळे करीत आहेत.






