लोणी काळभोर, ता. 3 : कॉलेजला जाण्यासाठी घराबाहेर पडलेली 22 वर्षीय तरुणी घरी परत न आल्याने लोणी काळभोर परिसरात खळबळ उडाली आहे. कुटुंबीयांनी तिचा मित्र-मैत्रिणी, नातेवाईक तसेच फुरसुंगी, हडपसर, उरुळी देवाची आणि लोणी काळभोर परिसरात शोध घेतला; मात्र तिचा ठावठिकाणा लागला नाही.

याप्रकरणी तरुणीच्या वडिलांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 वर्षीय तरुणी हि हांडेवाडी येथील किस्टोन कॉलेजमध्ये बी.कॉम (कॉम्प्युटर)च्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होती. कॉलेजला जाण्यासाठी तरुणी 1 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास घरातून बाहेर पडली. मात्र ती रात्रीपर्यंत घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तिच्या कॉलेजमधील मित्र-मैत्रिणींकडे चौकशी केली. तसेच विविध ठिकाणी शोध घेतला आणि नातेवाईकांकडेही माहिती घेतली; मात्र तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.

दरम्यान, मुलीच्या कुटुंबातील आई, भाऊ आणि बहिणीला ई-मेल केल्याचे तिच्या वडिलांनी तक्रारीत नमूद केले आहे. या ई-मेलमध्ये ती रोहित वाघमोडे याच्यासोबत जात असून त्याच्याशी लग्न करणार असल्याचे सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे. मुलीच्या वडिलांनी रोहित वाघमोडे याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली असून, पोलिसांकडून तिचा शोध घेण्यात येत आहे.








