लोणी काळभोर, ता. 16 : पहाटे पतीसह चालण्यासाठी (Uruli Kanchan) गेलेल्या महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्यांची सोनसाखळी हिसकावून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या अल्पवयीन चोरट्याला नागरिकांनी शिताफीने पकडले आहे. त्यानंतर नागरिकांनी चोरट्याला तात्काळ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही घटना उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात सोमवारी (ता. 16 ) पहाटे सुमारे पावणे सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. संबंधित महिलेच्या पतीच्या प्रसंगावधानामुळे चोरीचा डाव फसला असून पोलिसांनी आरोपीकडून दुचाकीसह सुमारे 1 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी जयश्री भरत काळे (वय 43 , रा. काळेवाडा, उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी एका अल्पवयीन चोरट्याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयश्री काळे या आपल्या पती भरत लक्ष्मण काळे (वय 51 ) यांच्यासह सोमवारी पहाटे नेहमीप्रमाणे उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या मैदानावर चालण्यासाठी गेल्या होत्या. सकाळी सुमारे साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्या शाळेच्या कोपऱ्याजवळ आल्या असताना काळा-लाल रंगाच्या बजाज पल्सर दुचाकीवरून आलेल्या एका युवकाने त्यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे सोन्याचे मिनींगठण जबरदस्तीने हिसकावण्याचा प्रयत्न केला.
यावेळी प्रसंगावधान राखत भरत काळे यांनी त्या दुचाकीला पाठीमागून पकडले. त्यामुळे दुचाकी खाली पडली व आरोपी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. दरम्यान, जयश्री व भरत काळे यांनी मोठ्याने “चोर… चोर…” असा आरडाओरडा केला. त्यामुळे परिसरातील नागरिक धावत आले. विजय कांचन व इतर नागरिकांच्या मदतीने त्या युवकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
पोलिसांच्या चौकशीत आरोपी हा अल्पवयीन असून तो सांगसे (ता. मावळ, जि. पुणे) येथील रहिवासी असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याच्याकडून २ लाख रुपये किंमतीचे अडीच तोळे सोन्याचे मिनींगठण तसेच 70 हजार रुपये किंमतीची एमएच 12 एमबीए 8007 क्रमांकाची बजाज पल्सर दुचाकी असा एकूण 2 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे उरुळी कांचन परिसरात सकाळच्या वॉकदरम्यान महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त होत असून, नागरिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे चोरट्याचा डाव फसल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.







