लोणी काळभोर, ता. 30 : खेळता खेळता पाण्याच्या चारीत पडून दोन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील पालखी तळाच्या परिसरात घडली असून आज मंगळवारी (ता.30) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सोहम लखन कसबे (वय १ वर्ष १० महिने, राहणार इंदिरानगर, कदमवाकवस्ती, ता.हवेली) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोहम कसबे हा घराच्या परिसरात खेळत होता. खेळता खेळता तो ग्रामपंचायतीने खोदलेल्या पाण्याच्या चारीत पडला. चारी चार फुट खोल असल्याने त्यात बुडला. नागरिकांनी त्याला बाहेर काढून लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. परंतु त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश बोराटे पोलीस अंमलदार शिवाजी दरेकर त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
दरम्यान, सोहम कसबे याचे नातेवाईक व सामाजिक कार्यकर्ते यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात घेराव घातला असून संबंधित दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.







