यवत, (पुणे) : विजेच्या धक्क्यातून एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात दोन सख्ख्या चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दौंड तालुक्यातील राहू परिसरातील सोनवणे मळा परिसरात बुधवारी (ता. 19) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ओम नितीन भोईटे (वय -18) आणि रोहित अनिल भोईटे (वय -21) अशी विजेचा धक्का लागून मृत्यू झालेल्या सख्ख्या चुलत भावांचा नावे आहेत. या घटनेने संपूर्ण सोनवणे मळ्यासह राहू परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ओम भोईटे हा घरात असताना त्याला अचानक विजेचा तीव्र धक्का बसला. भाऊ विजेच्या प्रवाहात अडकल्याचे पाहताच क्षणाचाही विलंब न करता रोहित भोईटे याने भावाला वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र, दुर्दैवाने रोहितही त्या विजेच्या प्रवाहाच्या संपर्कात आला आणि दोघांनाही विजेचा जोरदार झटका बसला.

आपल्या दोन्ही डोळ्यांसमोर मुलांना विजेचा धक्का बसत असल्याचे पाहून त्यांच्या आईनेही अत्यंत आक्रोशाने मदतीसाठी धाव घेतली; मात्र त्या सुदैवाने या घटनेतून थोडक्यात बचावल्या.घटनेनंतर तात्काळ परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन वीज प्रवाह खंडित केला आणि दोन्ही भावांना तातडीने यवत येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून उपचारापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाल्याचे घोषित केले.

दरम्यान, ओम आणि रोहित या दोघांना घरात नेमक्या कोणत्या उपकरणातून किंवा वायरमधून विजेचा धक्का बसला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच महावितरण आणि पोलीस प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. या दुर्घटनेचा सखोल तपास सुरू असून तपासानंतरच अपघाताचे मुख्य कारण समोर येणार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे भोईटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, दोन तरुण भावांचा असा अंत झाल्याने राहू परिसरात हळहळ व्यक्त होत आहे






