बारामती : काळ्या काचा आणि फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या महिंद्रा थारला कारवाईसाठी थांबवणाऱ्या वाहतूक पोलिसाच्या अंगावर चालकाने थेट वाहन घातल्याची धक्कादायक घटना बारामतीतील सम्यक चौकात घडली. एवढेच नव्हे, तर पोलिसाला बोनेटवरून सुमारे ४० ते ५० फूट फरफटत नेले. या घटनेत वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार दत्तात्रेय भोसले जखमी झाले असून, चालक वाहनासह पसार झाला आहे.

बुधवारी (ता. २५) सायंकाळी पाचच्या सुमारास दत्तात्रेय भोसले सम्यक चौकात कर्तव्य बजावत होते. त्यावेळी काळ्या काचा आणि फॅन्सी नंबर प्लेट असलेली महिंद्रा थार (एमएच ५३ ए ४४००) तेथे आली. भोसले यांनी वाहन थांबवण्याचा इशारा केला. ई-चलन मशीनद्वारे वाहनाचा फोटो काढत असताना चालकाने अचानक वेग वाढवून जीप थेट त्यांच्या अंगावर घातली.
धडकेमुळे भोसले बोनेटवर फेकले गेले. मात्र, चालकाने वाहन न थांबवता त्यांना काही अंतरापर्यंत फरफटत नेले. त्यानंतर तोल जाऊन भोसले रस्त्यावर पडले. या घटनेत त्यांच्या डाव्या हाताला आणि पायाला दुखापत झाली.

घटनेनंतर चालक थारसह घटनास्थळावरून पसार झाला. दत्तात्रेय भोसले यांच्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलिसांनी तपास सुरू केला. वाहनमालकाशी संपर्क साधल्यानंतर घटनेवेळी त्यांचा मुलगा धीरज शेडगे वाहन चालवत असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी धीरज शेडगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, त्याचा शोध घेतला जात आहे.
कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसालाच अशा प्रकारे लक्ष्य करण्यात आल्याने बारामती परिसरात खळबळ उडाली आहे.






