पुणे : पुणे शहरासह संपूर्ण महानगराची वाढती पाण्याची गरज भागवण्यासाठी स्वतंत्र धरण उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीनंतर नव्या धरणासाठी तीन संभाव्य जागांचा शोध घेण्यात येणार आहे. तसेच पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) आर्थिक व पाण्याच्या वाट्यातील हिस्सा काय असेल, याबाबत धोरणात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे.

सध्या पुणे शहराला खडकवासला धरण साखळीतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, शहराची वाढती लोकसंख्या, विस्तार आणि पिंपरी-चिंचवडसह पुणे महानगर क्षेत्राची वाढती गरज लक्षात घेता भविष्यात अतिरिक्त पाण्याची आवश्यकता भासणार आहे. खडकवासला धरणातून बारामती, इंदापूर आणि दौंड या भागांतील शेतीसाठीही पाणी दिले जाते. त्यामुळे पाणीसाठा कमी झाल्यास शहर आणि ग्रामीण भागातील पाणीवाटपावरून वाद निर्माण होतात.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नव्या धरणासाठी प्राथमिक सर्वेक्षण करून संभाव्य जागांचा शोध घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या होत्या. त्यानुसार संभाव्य जागांबाबत सादरीकरण झाले असून, जलसंपदा विभागाशी चर्चा करून पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे.

नव्या धरणासाठी नेमक्या कोणत्या जागांची निवड होणार, याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. धरणाचा खर्च पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच पीएमआरडीए यांनी उचलण्याची अपेक्षा आहे. मात्र, राज्य सरकार आर्थिक मदत करणार का आणि धरणातील पाण्याचा कोटा तिन्ही संस्थांना किती मिळणार, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
सध्या हा प्रस्ताव प्राथमिक स्तरावर आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून पुढील सूचना मिळाल्यानंतर संभाव्य जागा निश्चित करून धरणाचा आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, धरण साखळीतील पाणीसाठ्याचा विचार करता पुणे शहरात सध्या प्रस्तावित १० टक्क्यांऐवजी २० टक्के पाणीकपात करण्याची सूचना करण्यात आली आहे. याबाबत पुढील आठवड्यात महापालिकेतील सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर वाढीव पाणीकपातीबाबत निर्णय घेतला जाईल, असे महापौर मंजूषा नागपुरे यांनी सांगितले.






