पुणे: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात रविवारी सकाळी एक धक्कादायक प्रकार समोर आला. किकवी-केंजळ रस्त्याच्या कडेला सुमारे ४० वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे नागरिक कामासाठी बाहेर पडले असताना, रस्त्याच्या कडेला एक व्यक्ती निश्चल अवस्थेत पडलेली दिसली. नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले असता त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती तत्काळ राजगड पोलीस ठाणे येथे देण्यात आली.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. मात्र, मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४० वर्षे असून त्याने निळ्या रंगाचे जर्किन, निळी जीन्स आणि पांढरा टी-शर्ट परिधान केला होता.
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सध्या या प्रकरणी ‘अकस्मात मृत्यू’ अशी नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, हा मृत्यू नैसर्गिक आहे की घातपाताचा प्रकार आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी परिसरातील बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींची पडताळणी केली जात असून सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारेही तपास सुरू आहे. या घटनेमुळे किकवी परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.







