पुणे: पुण्यातील केतन अग्रवाल या तरुणाच्या अकाली निधनामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. केतनला श्रद्धांजली वाहण्यासाठी त्याच्या राहत्या लोढा सोसायटीतील शेजारी आणि मित्र-मैत्रिणी मोठ्या संख्येने एकत्र आले होते. या कठीण प्रसंगी केतनच्या वडिलांनी उपस्थितांचे आभार मानताना सर्वांना एक कळकळीचे आवाहन केले. घटनेच्या वेळी अनेक लोक त्या किल्ल्यावर उपस्थित होते, ते मेसेजही करत आहेत. दरम्यान, त्यांनी न घाबरता पुढे येऊन पोलिसांना सत्य सांगावे, अशी विनंती त्यांनी केली. अनेकांना माहिती आहे, पण ते पोलिसांसमोर येण्यास घाबरत आहेत, असे निदर्शनास आले आहे.

माहिती देणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. गुन्हेगाराला फाशीची शिक्षा व्हावी, हीच आमची मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. दरम्यान, पुणे पोलीस या गुन्ह्याचा तपास अत्यंत गांभीर्याने करत आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी शुक्रवारी तब्बल 10 तास सिया गोयल हिच्या भावाची, साहिल गोयल याची कसून चौकशी केली. साहिलची चेतन चौधरीशी ओळख असल्याचे तपासात पुढे आले आहे.

केतनला न्याय मिळवून देण्यासाठी आता सर्व स्तरातून प्रयत्न केले जात असून, या प्रकरणाचा तपास आता निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे. लवकरात लवकर गुन्हेगारांना शिक्षा व्हावी, हीच सर्वांची अपेक्षा आहे.








