पुणे (येरवडा) : पुण्यातील खराडी परिसरात एका 26 वर्षीय तरुणाने हॉटेलमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीने दुसऱ्या तरुणाशी विवाह केल्यामुळे तो मानसिक तणावात होता, अशी प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने आपल्या मित्रांना मोबाइलवरून संदेश पाठवला होता. या घटनेमुळे तरुणाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अक्षय कालिदास कांबळे (वय 26, रा. पूर्वरंग सोसायटी, पेरणे फाटा) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो कोरेगाव भीमा येथील स्टेट बँकेत कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होता. त्याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, संबंधित तरुणीने दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केल्यानंतर अक्षय काही दिवसांपासून नैराश्यात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय 27 ऑक्टोबर रोजी खराडी येथील गौरव रेसिडेन्सी हॉटेलमध्ये राहण्यासाठी आला होता. 29 ऑक्टोबर रोजी त्याला खोली रिकामी करायची होती. मात्र, दुपारपर्यंत खोलीचा दरवाजा उघडण्यात आला नाही. त्यामुळे हॉटेल व्यवस्थापकाने तपासणी केली असता अक्षय खोलीत मृतावस्थेत आढळला. त्याने पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले.

विशेष म्हणजे, टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी अक्षयने जवळच्या मित्रांना मोबाइलवर निरोप पाठवला होता. ‘आता ही शेवटची भेट, यानंतर पुढच्या जन्मी भेटू,’ असा संदेश त्याने पाठवला होता.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. अक्षयकडे गावठी पिस्तूल कुठून आले, याचाही शोध पोलीस घेत आहेत. त्याच्या पश्चात आई-वडील, विवाहित बहीण आणि लहान भाऊ असा परिवार आहे.







