इंदापूर, ता. 22 : माळवाडी क्रमांक 2 (ता. इंदापूर) येथील शेतकऱ्याच्या पेरूच्या बागेवर चोरट्यांनी डल्ला मारत तब्बल सात टन तयार पेरू चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमुळे शेतकरी संतोष रत्नाकर मखरे यांचे सुमारे 3 लाख 78 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, या घटनेने परिसरातील शेतकरी वर्गात चिंता व्यक्त होत आहे.

संतोष मखरे यांची माळवाडी क्रमांक 2 येथील गट क्रमांक 87/2 मध्ये शेती आहे. त्यांच्या शेतात तैवान जातीच्या पेरूची सुमारे दोन हजार 200 झाडे आहेत. सध्या पेरू तोडणीचा हंगाम सुरू असल्याने बागेत फळे मोठ्या प्रमाणावर तयार झाली होती.
बुधवारी (ता. 18) सायंकाळी सातच्या सुमारास मखरे शेतातून घरी गेले होते. पेरू तोडणीचे काम सुरू करण्यासाठी त्यांनी दत्तात्रेय सरडे यांच्या माध्यमातून मजूर बोलावले होते. गुरुवारी (ता. 19) सकाळी सातच्या सुमारास मजूर बागेत पोहोचले असता, झाडांवरील पेरू गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ मखरे यांना फोन करून चोरीची माहिती दिली.

दरम्यान, मखरे यांनी बागेची पाहणी केली असता, झाडांवरील मोठ्या प्रमाणातील पेरू चोरीला गेल्याचे दिसून आले. काही पेरू जमिनीवर पडलेले होते. अज्ञात चोरट्यांनी अंदाजे सात टन पेरू चोरून नेल्याचे, त्यांची किंमत तीन लाख 78 हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर चोरट्यांनी हात साफ केल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी इंदापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.





