पुणे: पुणे शहरात सध्या श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे उत्साही वातावरण पाहायला मिळत आहे. सगळीकडे विठ्ठलाच्या नामाचा जयघोष होत असला, तरी एका धक्कादायक बातमीमुळे भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वारीच्या अफाट गर्दीचा फायदा घेत काही भामट्यांनी भाविकांचे दागिने आणि महागडे मोबाईल चोरल्याचे उघड झाले आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत पुणे पोलिसांनी तातडीने कडक कारवाई सुरू केली असून, आतापर्यंत तब्बल 89 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

चोरट्यांनी वारीतील गर्दीचा फायदा उचलण्यासाठी वारकऱ्यांचे सोंग घेतल्याचे निदर्शनास आले आहे. शहरात चोरीच्या एकूण 11 घटनांची नोंद झाली असून, त्यातील 9 घटना केवळ हडपसर परिसरात घडल्या आहेत. याशिवाय विश्रामबाग, समर्थ, शिवाजीनगर, वानवडी आणि खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतही चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हडपसरच्या शंकरमठ-रामनाथ मळा परिसरात एका भाविकाचा 40,000 रुपये किमतीचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न झाला, परंतु स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे दोन संशयितांना रंगेहात पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात यश आले.

या चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी पुणे गुन्हे शाखेने विशेष पथके तैनात केली होती. या कारवाईत पोलिसांनी 67 महिला आणि 22 पुरुषांना ताब्यात घेतले आहे. इतकी मोठी पोलीस सुरक्षा यंत्रणा तैनात असतानाही या चोऱ्या कशा झाल्या, याचा तपास सध्या पोलिस करत आहेत.







