आदित्य बोराटे

इंदापूर: इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथील तोबरेवस्ती परिसरात अज्ञात चोरट्यांनी पत्र्याच्या शेडमध्ये बांधलेल्या दोन गाभण शेळ्या आणि तीन बोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत सुमारे ३५ हजार रुपयांचे जनावर लंपास केले असून, या प्रकरणी इंदापूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, दादासाहेब बाबूराव जगताप (वय ४५, रा. तोबरेवस्ती, वडापुरी, ता. इंदापूर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (१ जुलै) रात्री साडेनऊ ते गुरुवारी (२ जुलै) पहाटे साडेतीनच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी जगताप यांच्या घरामागील पत्र्याच्या शेडमध्ये प्रवेश केला. तेथे बांधलेल्या दोन गाभण शेळ्या (किंमत १४ हजार रुपये) आणि तीन बोकड (किंमत २१ हजार रुपये) असा एकूण ३५ हजार रुपयांचे जनावर चोरून नेले.
सकाळी शेडमध्ये जनावरे नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर परिसरात शोधाशोध करण्यात आली. मात्र, जनावरांचा मागमूस न लागल्याने जगताप यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ग्रामीण भागात जनावरांच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार कानतोडे करत आहेत.







