उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन ग्रामपंचायत प्रशासनाच्या अत्यंत ढिसाळ आणि भोंगळ कारभारामुळे उरुळी कांचन परिसरातील तब्बल 990 बालकांना अद्याप आपले हक्काचे आधार कार्ड मिळू शकलेले नाही. 2024 मध्ये जन्मलेल्या या बालकांच्या जन्माची नोंद वेळेत न केल्यामुळे हा तांत्रिक घोळ निर्माण झाला या गंभीर समस्येची दखल घेत, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) गजानन पाटील यांनी येत्या 15 दिवसांत हा संपूर्ण विषय कायदेशीररीत्या मार्गी लावू, अशी ग्वाही ग्रामस्थांना दिली आहे.

उरुळी कांचन (ता. हवेली) येथील ‘ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन’ संचलित ‘उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुप’ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. 14) जागतिक रक्तदान दिनानिमित्त शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पाटील उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांच्या मागणीवर भाष्य करताना वरील ग्वाही पाटील यांनी दिली.

केंद्र सरकारने संपूर्ण देशात जन्म व मृत्यूची अचूक नोंद ठेवण्यासाठी ‘नागरी नोंदणी प्रणाली यंत्रणा’ (CRS) हे नवीन डिजिटल पोर्टल वापरासाठी खुले केले. ‘जन्म आणि मृत्यू नोंदणी सुधारणा कायदा 2023’ नुसार, 1 ऑक्टोबर 2023 पासून या नवीन पोर्टलवरच सर्व नोंदी करणे देशात अनिवार्य करण्यात आले होते. त्यानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीला या पोर्टलचे लॉगिन आयडी आणि पासवर्ड देण्यात आले होते.
सर्व कायदेशीर सक्ती असतानाही, उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या तत्कालीन जबाबदार कर्मचाऱ्याने सन २०२४ या संपूर्ण वर्षात स्थानिक रुग्णालयांमध्ये जन्मलेल्या 990 बालकांच्या जन्माच्या नोंदी या राष्ट्रीय पोर्टलवर केल्याच नाहीत! या निष्काळजीपणाचे उत्तर आज घडीला ग्रामपंचायतीचा कोणताही अधिकारी स्पष्टपणे द्यायला तयार नाही.
दरम्यान, या कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी याबाबत विचारणा केली असता गजानन पाटील यांनी बालकांच्या आधार कार्डचा विषय 15 दिवसात मार्गी लावणार असल्याचे सांगितले. कोणत्याही बालकाचे नुकसान होऊ दिले जाणार नाही असे आश्वासन ही देण्यात आले.







