लोणी काळभोर, ता. २६ : “राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक समतेचा पाया भक्कम केला. वंचित, शोषित आणि पददलित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आरक्षणासारखा ऐतिहासिक निर्णय घेतला. शिक्षणाचा प्रसार, शेतीचा विकास आणि सर्वसमावेशक समाजरचनेसाठी त्यांनी केलेले कार्य आजही समाजाला प्रेरणा देणारे आहे,” असे प्रतिपादन समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. विजयकुमार घोडके यांनी केले.

लोणी काळभोर (ता. हवेली) येथील समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयात थोर समाजसुधारक, लोककल्याणकारी राजे आणि सामाजिक न्यायाचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज यांची जयंती शुक्रवारी (ता. २६) उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. विजयकुमार घोडके होते. प्रारंभी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी शाहू महाराजांच्या कार्याला अभिवादन केले.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. घोडके यांनी शाहू महाराजांच्या जीवनकार्याचा आढावा घेत त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रातील योगदानावर प्रकाश टाकला. समाजातील सर्व घटकांना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा आदर्श आजही तितकाच महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, या कार्यक्रमास प्रा. मुकेश महाले, प्रा. सिद्धारूढ ऐवळे, ग्रंथपाल नीलिमा हेमाडे, सेवक रामबहादुर साउद यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी शाहू महाराजांच्या समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. शिवाजी गायकवाड यांनी केले, तर डॉ. संभाजी निकम यांनी उपस्थितांचे आभार मानले.






