पौड : मुळशी तालुक्यातील प्रसिद्ध प्लस व्हॅली परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या २० वर्षीय तरुणाचा दरीत कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. काही मिनिटांचा वेळ वाचवण्यासाठी सुरक्षित मार्ग सोडून शॉर्टकटने जाणे तरुणाच्या जीवावर बेतले. सुमारे २०० फूट खोल दरीत कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पौड पोलिसांसह विविध रेस्क्यू पथकांनी संयुक्त मोहीम राबवत रोप रेस्क्यू ऑपरेशनच्या माध्यमातून मृतदेह दरीतून बाहेर काढला.

साहीद अन्सारी (वय २०, सध्या रा. ताथवडे, ता. मुळशी; मूळ रा. बैकटपूर, जि. मुजफ्फरपूर, बिहार) असे मृत तरुणाचे नाव आहे. साहीद आपल्या चार मित्रांसोबत मुळशी तालुक्यातील प्लस व्हॅली आणि मिल्कीबार धबधबा परिसर पाहण्यासाठी गेला होता. पर्यटनाचा आनंद घेतल्यानंतर सर्वजण परतत असताना त्यांनी नेहमीच्या सुरक्षित मार्गाऐवजी शॉर्टकटचा पर्याय निवडला.
मात्र, हा मार्ग अत्यंत धोकादायक होता. या ठिकाणी सुमारे ४५ अंशांचा तीव्र उतार होता. या उतारावरून खाली उतरत असताना अचानक साहीदचा पाय घसरला आणि तोल जाऊन तो अंदाजे २०० फूट खोल दरीत कोसळला. या दुर्घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.

तरुण दरीत कोसळल्याची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पौड पोलीस ठाण्याचे पथक, रोहा रेस्क्यू टीम आणि एस.व्ही.आर.एस.एस. पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

त्यानंतर सर्व पथकांनी संयुक्तपणे बचावमोहीम सुरू केली. रोप रेस्क्यू ऑपरेशनच्या साहाय्याने पथकातील सदस्य दरीत उतरले आणि अथक प्रयत्नांनंतर साहीदचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पर्यटनस्थळी फिरताना अनोळखी किंवा धोकादायक शॉर्टकटचा वापर टाळावा आणि सुरक्षित मार्गानेच प्रवास करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.







