यवत, (पुणे) : यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरीपार्धी (ता. दौंड) येथे दत्त मंगल कार्यालयाजवळ स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून 25 लाख 50 हजार 900 रुपये किमतीचा एकूण 41 किलो 18 ग्रॅम गांजा आणि कार जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी काळेपडळ (हडपसर) येथे राहणाऱ्या दोन तस्करांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून त्यांच्यावर NDPS ॲक्टनुसार कडक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुपा ते केडगाव चौफुला रस्त्यावरील बोरीपार्धी हद्दीत दत्त मंगल कार्यालयाजवळ रविवारी (ता. 04) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.

हर्षवर्धन अशोक बरडे (वय-29) सध्या रा. काळेपडळ, हडपसर, ता. हवेली, (मूळ रा. रायगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर), कुशाल दत्तात्रय बिनवडे (वय-30) सध्या रा. काळेपडळ, हडपसर, ता. हवेली, (मूळ रा. वंजारवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार विकास कापरे यांनी फिर्यादी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सुपा ते केडगाव चौफुला रस्त्यावरील बोरीपार्धी हद्दीत दत्त मंगल कार्यालयाजवळ एका मारुती स्विफ्ट डिझायर कारमधून अमली पदार्थांची वाहतूक होणार असल्याची बातमी स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार विकास कापरे व त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी सापळा रचला. संशयित पिवळी नंबरप्लेट असलेली पांढऱ्या रंगाची मारुती स्विफ्ट डिझायर कार येताच पोलिसांनी तिला रोखून झाडाझडती घेतली.

कारची तपासणी केली असता, त्यात नायलॉनच्या दोन गोणींमध्ये प्लास्टिक चिकटपट्टीने गुंडाळलेले 20 बंडल मिळून आले. या गोणींमध्ये हिरवट काळसर रंगाचा बिया, बोंडे व भुग्यासह असलेला गांजाचा साठा सापडला. दोन पोत्यात एकूण 20 लाख 50 हजार 900 रुपये किमतीचा 41 किलो 18 ग्रॅम गांजा आढळून आला. घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला पाचारण करून हा संपूर्ण गांजाचा साठा पंचांसमक्ष अधिकृतपणे सीलबंद करण्यात आला.
दरम्यान, आर्थिक फायद्यासाठी स्वतःच्या ताब्यात कार ठेवून बेकायदेशीरपणे गांजाची विक्री व वाहतूक करणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आंतरजिल्हा गांजा तस्करीच्या रॅकेटचे मूळ कुठपर्यंत पसरले आहे, याचा कसून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गाढवे करत आहेत.






