खेड, ता. 5 : कनेरसर (ता.खेड) येथील बंद घराचे कडी-कोयंडा व कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील लोखंडी कॉट, भांडी, पितळ-तांब्याचे साहित्य, लोखंडी पाइप, लाकडी फळ्या, मोटारसायकलचे सुटे भाग यासह तब्बल 1 लाख 9 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे घरात प्रवेश करण्यासाठी चोरट्यांनी पडवीचे कौलारू छत आणि भिंत फोडून सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान केले आहे.

याप्रकरणी पत्रकार सुनील बबनराव टाव्हरे (वय 58 , रा. राजगुरुनगर) यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कनेरसर येथील त्यांचे वडिलोपार्जित घर सध्या बंद असते. 26 सप्टेंबर रोजी ते गावी गेले असता घर व्यवस्थित बंद होते. मात्र, 2 ऑक्टोबर रोजी गावातील रंजना दौंडकर यांनी फोन करून घराचा दरवाजा उघडा असल्याची माहिती दिली. त्यानंतर 4 ऑक्टोबर रोजी सकाळी टाव्हरे कुटुंबीयांसह कनेरसर येथील घरी गेले असता घराचे कडी-कोयंडा व कुलूप तोडलेले दिसले. तसेच पडवीचे कौलारू छत व भिंत फोडल्याचे निदर्शनास आले. घराची पाहणी केली असता विविध वस्तू गायब असल्याचे आढळून आले.

दरम्यान, चोरीस गेलेल्या वस्तूंमध्ये दोन लोखंडी कॉट, लोखंडी भांड्यांची मांडणी, पितळ व तांब्याचे हांडे-भांडी, स्टीलची भांडी, लोखंडी पाइप व नळ्या, लाकडी फळ्या, पत्र्याचे व स्टीलचे डबे, मोटारसायकलचे इंजिन, पेट्रोल टाकी, मडगार्ड व शो तसेच घराबाहेरील शौचालयाचा दरवाजा आणि विद्युत मीटर यांचा समावेश आहे.

टाव्हरे यांनी या चोरीप्रकरणी अरविंद चंदुलाल जाधव, सागर अरविंद जाधव आणि सफल अरविंद जाधव (सर्व रा. कनेरसर) यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. टाव्हरे कुटुंबीयांचा अरविंद जाधव यांच्यासोबत शेतीच्या मालकी हक्कावरून मुंबई उच्च न्यायालयात दावा प्रलंबित असल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे कनेरसर परिसरात खळबळ उडाली असून, बंद घरांना चोरट्यांकडून लक्ष्य केले जात असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिस या चोरीचा छडा लावून संशयितांपर्यंत कधी पोहोचणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.






