पुणे: मित्रांसोबत विकेंडला निसर्गरम्य ठिकाणी फिरण्यासाठी गेलेल्या 22 वर्षीय विद्यार्थ्याचा ताम्हिणी घाटात दुर्दैवी मृत्यू झाला. मिल्कीबार धबधब्याच्या पाण्याच्या कुंडात पोहण्यासाठी उतरलेला तरुण अचानक बेपत्ता झाला. शोधमोहीम राबवल्यानंतर त्याचा मृतदेह कुंडाच्या सुमारे 25 ते 30 फूट खोलीवर आढळून आला.

मृत तरुणाचे नाव आयुष शिवसिंग नेगी (वय 22) असे असून तो मूळचा ऋषिकेश, उत्तराखंड येथील रहिवासी होता. शिक्षणासाठी तो पुण्यात आला होता आणि सध्या मुळशी तालुक्यातील भुकूम येथे राहत होता. तो पुण्यातील पीआयबीएम कॉलेजमध्ये शिक्षण घेत असल्याची माहिती आहे.

शनिवारी सुट्टी असल्याने आयुष मित्रांसोबत मुळशी परिसरात फिरायला गेला होता. मित्रमंडळी ताम्हिणी घाटातील मिल्कीबार धबधब्याजवळ पोहोचली. धबधब्याचे पाणी ज्या जलकुंडात साचते, त्या ठिकाणी आयुष पोहण्यासाठी उतरला. मात्र, काही वेळातच तो पाण्यात दिसेनासा झाला. मित्रांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा ठावठिकाणा लागला नाही.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पौड तसेच रायगड जिल्ह्यातील संबंधित पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहोचली. जलकुंडात शोधमोहीम सुरू करण्यात आली. बराच शोध घेतल्यानंतर आयुषचा मृतदेह पाण्याच्या खोल भागात सापडला. या घटनेमुळे आयुषच्या मित्रांना मोठा धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.






