पुणे: बिबवेवाडी परिसरात अल्पवयीन मुलाच्या हातातील देशी बनावटीच्या पिस्तुलातून अचानक गोळी सुटल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारात रस्त्यावरून जाणारा 25 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला. जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

ही घटना गंगाधाम रोडवरील आईमाता मंदिर परिसरात घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, 17 वर्षीय मुलाकडे बेकायदा देशी बनावटीचे पिस्तुल होते. हे पिस्तुल हाताळत असताना अचानक त्यातून गोळी सुटली. त्यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या विजय भास्कर पाटील यांना गोळी लागली. अचानक सुटलेली गोळी तरुणाच्या पार्श्वभागात लागली. गोळी लागल्यानंतर विजय पाटील गंभीर जखमी झाले आणि ते रस्त्यावर कोसळले.

घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, शहरात बेकायदा शस्त्र बाळगण्यावर निर्बंध असतानाही अल्पवयीन मुलाच्या ताब्यात पिस्तुल कसे आले, हा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाला आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे. घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.








