पुणे: बारामती तालुक्यात एका महिलेचा आणि तिच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा छळ केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पुण्यातील नांदेड सिटी परिसरात राहणाऱ्या पती-पत्नीविरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही मूळचे दिल्लीचे रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार, डिसेंबर 2024 पासून 1 ऑक्टोबर 2026 पर्यंत हा प्रकार सुरू असल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार, आरोपी नीरज कुमार झा याने संबंधित महिलेच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. तसेच तिच्या अल्पवयीन मुलीलाही लैंगिक गैरवर्तनाचा सामना करावा लागल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

प्रकरणातील आणखी एक गंभीर बाब म्हणजे नीरज झा याची पत्नी निमिशा मिश्रा उर्फ झा हिलाही या प्रकाराची माहिती असल्याचा आरोप आहे. मुलीच्या शिक्षणावर परिणाम होईल आणि कुटुंबाची बदनामी होईल, अशी भीती दाखवून महिलेवर अनेकवेळा बलात्कार करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, निमिशा हिने संबंधित महिलेला बदनामीची धमकी देत पैशांची मागणी केली. तसेच अल्पवयीन मुलीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी ई-मेलच्या माध्यमातून देण्यात आल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर बारामती तालुका पोलिसांनी पती-पत्नीविरोधात गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरु आहे.






