मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि मुंबईचे माजी महापौर सुनील प्रभू यांच्या कारचा अपघात झाल्याची घटना मुंबईतील विलेपार्ले परिसरात घडली आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील सेंटर ब्रिजखाली हा प्रकार घडला. या दुर्घटनेत रस्त्याने जाणारा एक तरुण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील प्रभू हे एअरपोर्टवरून कांदिवलीच्या दिशेने प्रवास करत होते. त्यावेळी ते स्वतः कारमध्ये उपस्थित होते, तर वाहन त्यांचा चालक चालवत होता. प्रवासादरम्यान सुनील धुलविया नावाच्या पादचाऱ्याला कारची धडक बसली. धडकेनंतर ते रस्त्यावर पडले आणि त्यांना दुखापत झाली.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रत्यक्षदर्शींनीही जखमी तरुणाला मदत केली. त्यानंतर त्याला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हा अपघात विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांकडून आता या घटनेचा तपास सुरू आहे. जखमी सुनील धुलविया यांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यांच्या अधिकृत जबाबानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.






