फुरसुंगी, ता. 18 : वडिलोपार्जित जागेतून गेलेल्या रस्त्याच्या मोबदल्यातील हिश्शाची रक्कम मागितल्याच्या कारणावरून भावांमध्ये वाद झाला. या वादातून एका भावाला बुक्क्यांनी मारहाण करून त्याचा दात पाडल्याचा, तसेच दुसऱ्या भावाने लाकडी दांडक्याने हातावर आणि पाठीवर मारहाण केल्याचा प्रकार फुरसुंगी येथे घडला. याप्रकरणी दोन भावांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

संतोष विठ्ठल चव्हाण (वय 53) यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार सुरेश व प्रकाश चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष चव्हाण यांच्या फुरसुंगी येथील वडिलोपार्जित जागेतून रस्त्यासाठी काही क्षेत्र गेले असून, त्याचा अंदाजे 4 लाख रुपये मोबदला त्यांचा भाऊ प्रकाश चव्हाण यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे. या मोबदल्यातील आपला हिस्सा मिळावा, यासाठी संतोष यांचा भावांसोबत यापूर्वीपासून वाद सुरू असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

संतोष यांनी त्यांच्या हिश्शाची रक्कम 13 सप्टेंबर रोजी रात्री सुमारे 8 वाजता मागितली. त्यावेळी सुरेश चव्हाण याने “तुला पैसे मिळणार नाहीत”, असे म्हणत त्यांच्या डाव्या डोळ्याजवळ आणि तोंडावर दोन ते चार वेळा जोरात बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत संतोष यांच्या तोंडातील समोरील एक दात पडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

मारहाणीमुळे संतोष खाली पडल्यानंतर प्रकाश चव्हाण याने जमिनीवर पडलेल्या लाकडी दांडक्याने त्यांच्या हातावर आणि पाठीवर मारहाण केल्याचा आरोप आहे. हा प्रकार सुरू असताना संतोष यांच्या पत्नी वंदना यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोन्ही भावांनी त्यांनाही शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे. मारहाणीत जखमी झाल्यानंतर संतोष यांना पोलिसांनी वैद्यकीय उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठविले. उपचार घेतल्यानंतर त्यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात येऊन सुरेश व प्रकाश चव्हाण यांच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.







