पुणे : दिशा सालियान मृत्यू प्रकरणातील कायदेशीर लढाई आता अधिक तीव्र झाली असून, तिचे वडील सतीश सालियान हे वकिलांच्या ताफ्यासह मुंबईतील ठाकरे कुटुंबाचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ बंगल्याबाहेर धडकले. आमदार आदित्य ठाकरे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ठोकलेल्या 500 कोटी रुपयांच्या मानहानीच्या दाव्याची नोटीस प्रत्यक्ष सुपूर्द करण्यासाठी ते येथे पोहचले होते.

मातोश्रीवर पोहोचण्यापूर्वी सतीश सालियान यांनी माध्यमांशी बोलताना आक्रमक पवित्रा घेतला. “मला कोणीही नियंत्रित करू शकत नाही, फक्त ईश्वरच मला नियंत्रित करू शकतो,” अशा कठोर शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली. वकिलांच्या वेळकाढू पणामुळे सहा वर्षांचा काळ गेला असला तरी, पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. सतीश सालियान यांच्या आगमनाची माहिती मिळताच मातोश्रीवर राजकीय हालचालींना उधाण आले.

शिवसेना (ठाकरे गट) खासदार अनिल देसाई तातडीने तेथे दाखल झाले. आदित्य ठाकरे यांच्या वतीने अॅडव्होकेट राहुल दिवटे आणि अॅडव्होकेट अनिल जाधव यांनी मुख्य प्रवेशद्वारावर थांबून कायदेशीर नोटीस स्वीकारली व तिची पोच पावती सालियान यांच्या वकिलांना दिली. या संपूर्ण घटने दरम्यान मातोश्रीबाहेर मोठे नाट्य आणि गदारोळ पाहायला मिळाला. सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी मुख्य प्रवेशद्वार बंद करून मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

मातोश्रीबाहेर जमलेल्या आक्रमक शिवसैनिकांनी सतीश सालियान यांना आत जाऊ न देण्याची ठाम भूमिका घेतली होती. दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या वक्तव्यांनंतर हे मानहानीचे पाऊल उचलण्यात आले आहे. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या वर्तुळात पुन्हा एकदा मोठा हायव्होल्टेज ड्रामा रंगला आहे.







