सागर जगदाळे

भिगवण: इंदापूर आणि करमाळा तालुक्यांना जोडणाऱ्या भीमा नदीवरील डिकसळ येथील जुन्या ब्रिटिशकालीन पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पुलावरून जड वाहनांच्या वाहतुकीस बंदी असतानाही ऊस गाळप हंगाम सुरू झाल्याने भरलेल्या ऊसाच्या ट्रॅक्टर-ट्रॉलींची वर्दळ वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे पुलाच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

सुमारे १८५५ च्या काळात उभारण्यात आल्याचे सांगितले जाणाऱ्या या पुलातील दगड काही वर्षांपूर्वी सैल झाल्याने जड वाहतुकीसाठी तो बंद करण्यात आला होता. पुलाच्या दोन्ही बाजूंना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जड वाहनांना प्रवेशबंदी असल्याचे फलक लावण्यात आले असून, पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, ऊस वाहतुकीचा हंगाम सुरू झाल्यानंतर भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉली या पुलावरून जात असल्याचे दिसत असल्याने बंदीची प्रभावी अंमलबजावणी होते आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पुलाच्या एका बाजूला जड वाहनांना अडवण्यासाठी असलेल्या अडथळ्याची उंची किंवा त्याची परिणामकारकता कमी झाल्याचे दिसत असल्याने ट्रॅक्टर-ट्रॉलींना मार्ग मिळत असल्याची शक्यता आहे. पुलाजवळ रस्त्यावर मोठा खड्डाही असून, त्याच्या बाजूने पर्यायी वाट काढून वाहने जात असल्याचे चित्र आहे. या परिस्थितीची संबंधित विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे.
दरम्यान, जुन्या पुलाजवळील रस्त्यावर ऊसाची ट्रॉली उलटल्याची घटना नुकतीच घडली. यामुळे परिसरात वाहतुकीची कोंडी झाली आणि वाहनांच्या रांगा सुमारे दोन ते तीन किलोमीटरपर्यंत लागल्याचे सांगण्यात आले. ही घटना पुलावर घडलेली नसली, तरी या मार्गावरील वाहतूक आणि सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
डिकसळचा हा पूल पूर्णपणे बंद पडल्यास परिसरातील सीमावर्ती गावांमधील नागरिकांना भिगवणमार्गे जाण्यासाठी सुमारे ४० किलोमीटरचा वळसा घालावा लागू शकतो. त्यामुळे विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी तसेच दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
संभाव्य धोका टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या करमाळा आणि भिगवण येथील संबंधित यंत्रणांनी संयुक्त पाहणी करावी, जड वाहनांना रोखणाऱ्या अडथळ्यांची स्थिती तपासावी आणि बंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा संभाव्य धोका वेळीच ओळखून खबरदारी घेणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.







