पुणे : पुणे शहरातील वानवडी परिसरात वर्षभरापूर्वी झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात वानवडी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ७ लाख ५० हजार रुपये किमतीचे ७४.८ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. याशिवाय तक्रारदाराच्या मुलांची महत्त्वाची शैक्षणिक कागदपत्रेही पोलिसांनी हस्तगत केली आहेत.

वानवडी पोलीस ठाण्यात ७ नोव्हेंबर २०२५ रोजी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारदाराचे घर बंद असताना अज्ञात चोरट्याने छतावरून गॅलरीत प्रवेश करून घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मुलांची महत्त्वाची शैक्षणिक कागदपत्रे चोरून नेली होती. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता.

सुरुवातीला पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे आणि अल्फाज शेख यांनी या गुन्ह्याचा तपास केला. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक शशिकांत लोंढे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक तपास तसेच गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपासाला गती दिली. या तपासातून एकूण पाच आरोपींचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

अटक केलेल्या आरोपींपैकी एका आरोपीकडून चोरीची शैक्षणिक कागदपत्रे जप्त करण्यात आली. तर अन्य दोन आरोपींकडून चोरीस गेलेल्या सोन्यापैकी ७४.८ ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले. या सोन्याची किंमत ७ लाख ५० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वानवडी पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली. या प्रकरणातील पुढील तपास पोलीस करत आहेत.








