लोणी काळभोर, ता. 9 : थेऊर फाटा ते कोलवाडी रस्त्यावर महिंद्रा एक्सयुव्ही, बलेनो कार व मोटार सायकल या तीन वाहनांचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. ही घटना थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कल्पतरु बागेच्या समोर शनिवारी (ता.7) रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात दोन सख्ख्याभावासह तिघेजन जखमी झाले आहेत.

रामेश्वर यशवंत हरगुडे (वय -34), नवनाथ यशवंत हरगुडे (वय, 40, दोघेही रा. हरगुडेवस्ती , केसनंद, ता. हवेली) व हमीद इसाक शेख (वय – 33, रा. सखाराम नगर, थेऊर, ता. हवेली) अशी जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत. तर सुजीत काकडे (रा. थेऊर, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वाहन चलकाचे नाव आहे . याप्रकरणी रामेश्वर हरगुडे यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामेश्वर हरगुडे हे पेशाने वकील असून कुटुंबासोबत केसनंद परिसरात राहतात. ते त्यांच्या महिंद्रा एक्सयुव्ही गाडीतून कुटुंबासोबत बाहेरगावी गेले होते. हरगुडे हे त्यांचे काम आटोपल्यानंतर थेऊर फाट्याकडून केसनंदच्या दिशेकडे चालले होते. दरम्यान, त्यांची महिंद्रा एक्सयुव्ही गाडी कल्पतरु बागेच्या समोर आली असता, थेऊर कडून थेऊर फाट्याच्या दिशेने चाललेल्या भरधाव बलेनो कारने दुचकीला जोरदार धडक दिली. आणि दुचाकी चालक हमीद शेख याला गंभीर जखमी केले.

त्यानंतर बलेनो कारवरील चालक सुजीत काकडे याने रामेश्वर हरगुडे यांच्या महिंद्रा एक्सयुव्ही गाडीलाही जोरदार धडक दिली. आणि चालक सुजीत काकडे हा घटनास्थळावरुन पळून गेला. या अपघातात रामेश्वर हरगुडे, नवनाथ हरगुडे व हमीद शेख हे तिघेही जखमी झाले आहेत.

दरम्यान, सुजीत काकडे याने त्याच्या ताब्यातील कार हि दारुच्या नशेत भरधाव वेगात निष्काळजीपणाने चालवून, या आपघातास व तिघांना जखमी करण्यास कारणीभूत ठरला आहे. अशी फिर्याद रामेश्वर हरगुडे यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात दिली आहे.
त्यानुसार, सुजीत काकडे याच्यावर भारतीय न्याय संहीता २०२३ कलम २८१, १२५ (a), १२५ (b) व मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम 184 , 185 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार चंद्रकांत माने करीत आहेत.







