जेजुरी: जेजुरी परिसरातील भोंगळे मळा येथे आषाढी वारीसाठी पायी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत ट्रक घुसला. या दुर्घटनेत ३ महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत झाला असून, या घटनेने वारकरी संप्रदायात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वारकरी दिंडीमार्गे जात असताना मागून आलेल्या एका भरधाव ट्रकने त्यांना भीषण धडक दिली. ट्रकची धडक इतकी भीषण होती कि, दिंडीत चालणाऱ्या ३ महिलांना जागीच मृत्यू झाला. या अपघातात इतर ३ वारकरी गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर सध्या उपचार सुरू असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

घटना घडताच परिसरातील नागरिक आणि इतर वारकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली, मात्र ट्रकच्या धडकेत महिलांचा जागीच मृत्यू झाल्याने त्यांना वाचवता आले नाही. माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.
या भीषण अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. ट्रकचे ब्रेक फेल झाले होते, चालकाचे नियंत्रण सुटले होते की अन्य काही तांत्रिक बिघाड झाला होता, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.







