पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी येथील कचरा व्यवस्थापन प्रकल्पात घडलेल्या भीषण दुर्घटनेने महाराष्ट्राला शोकमग्न केले आहे. कचऱ्यापासून वीज निर्मिती करणाऱ्या या केंद्रात काम करताना तब्बल ९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. प्रारंभी या कामगारांचा जीव गुदमरून गेला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र वैद्यकीय चाचणीतून एक अत्यंत भयानक आणि वेगळीच माहिती समोर आली आहे.

पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. डॉक्टरांच्या निष्कर्षानुसार, कर्मचाऱ्यांचा मृत्यू ऑक्सिजन न मिळाल्याने नाही, तर गंभीर शारीरिक दुखापती आणि अतिरक्तस्त्रावामुळे झाला आहे. अपघाताच्या वेळी प्रकल्पाची इमारत एका बाजूला झुकली, त्यामुळे स्टीलचे जड सांगाडे, खिडक्यांच्या काचा आणि ढिगारा अचानक अंगावर कोसळला. ढिगाऱ्याच्या असह्य दबावामुळे कामगारांची छाती, पोट आणि पाय पूर्णपणे चिरडले गेले. शरीराच्या आत झालेला प्रचंड रक्तस्राव आणि हाडांचे झालेले तुकडे हेच त्यांच्या मृत्यूचे खरे कारण ठरले आहे.

शवविच्छेदनात श्वास गुदमरल्याचे कोणतेही प्राथमिक पुरावे मिळालेले नाहीत. तरीही सत्यता पडताळण्यासाठी मृतदेहांचे व्हिसेरा नमुने सुरक्षित ठेवण्यात आले असून, अंतिम अहवाल आल्यावर अधिक स्पष्टता येईल. दरम्यान, या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे. या भीषण घटनेची दखल घेत महापालिका आयुक्त डॉ. शेखर सिंह यांनी पीडित कुटुंबांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.








