लोणी काळभोर, ता. 17 : “साहेब, आम्हाला गोळ्या घाला, जीव घ्या… पण आमची मुलगी शोधून द्या!” अशी हृदयद्रावक आर्त हाक देत कुंजीरवाडी येथील अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांनी पुण्यातील वरिष्ठ पोलीस कार्यालयासमोर टाहो फोडला. तब्बल दीड महिना उलटूनही मुलीचा शोध लागलेला नसल्याने संतप्त कुटुंबाने “पुढील दोन दिवसांत मुलगी सापडली नाही तर मुख्यमंत्री कार्यालयासमोर कुटुंबासह आत्मदहन करू,” असा गंभीर इशारा प्रशासनाला दिला आहे. दरम्यान, आरोपीचा ठावठिकाणा सांगणाऱ्यास योग्य ते बक्षीस देण्याचे जाहीर करण्यात आल्याने या प्रकरणाने अधिकच गंभीर वळण घेतले आहे.
कुंजीरवाडी (ता. हवेली) परिसरातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी खासगी कोचिंग क्लासला गेल्यानंतर अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी ही कुंजीरवाडी परिसरातील एका नामांकित विद्यालयात नववीत शिक्षण घेत आहे. ती नियमितपणे खासगी क्लासला जात होती. शाळेला सुट्टी असल्याने त्या दिवशी सकाळी दहा ते साडेअकरा या वेळेत क्लास होता. सकाळी ९.५० वाजता मुलीचा भाऊ तिला रिक्षाने क्लासजवळ सोडण्यासाठी गेला होता.
बहिणीला क्लासबाहेर सोडून तो परिसरातच थांबला होता. मात्र, क्लास सुटल्यानंतर सर्व विद्यार्थी बाहेर आले तरी त्याची बहिण कुठेच दिसली नाही. त्याने क्लासमध्ये जाऊन चौकशी केली असता, “ती क्लासलाच आली नव्हती,” अशी माहिती शिक्षकांनी दिली. भावाचे लक्ष नसल्याची संधी साधून मुलगी बेपत्ता झाल्याचे उघड झाले.
यानंतर कुटुंबीयांनी कुंजीरवाडीसह परिसरातील सर्व ठिकाणी आणि नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र, मुलीचा कोणताही मागमूस लागला नाही. अखेर कोणीतरी अज्ञात इसमाने अल्पवयाचा गैरफायदा घेत मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत कुटुंबीयांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणात समाधान उर्फ सुशील गंगाधर सूर्यवंशी (वय २४) याचे नाव समोर आले असून, त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, “दीड महिना झाला तरी पोलीस मुलीचा शोध लावू शकले नाहीत. आम्ही रोज पोलिसांच्या दारात हेलपाटे मारत आहोत. आता आमच्याकडे आत्मदहनाशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही,” अशी व्यथा मुलीच्या आई-वडिलांनी लोणी काळभोर सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आज व्यक्त केली आहे.
माहिती देणाऱ्यास बक्षीस जाहीर
आरोपीबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या ०२०-२९९९५२६० या क्रमांकावर अथवा थेट माझ्याशी ९५१८९७४३१२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी केले आहे. तसेच माहिती देणाऱ्यास योग्य ते बक्षीस देण्यात येणार असून, माहिती देणाऱ्याचे नाव आणि मोबाईल क्रमांक गोपनीय ठेवण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
“समाधान उर्फ सुशील सूर्यवंशी हा अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याच्या प्रकरणातील संशयित आरोपी आहे. मागील दीड महिन्यांपासून मुलीचा शोध घेण्यासाठी तीन पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड, लातूर, नागपूर आणि सोलापूर या आठ जिल्ह्यांत कसून शोध घेतला. मात्र, आरोपीचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. आरोपी मोबाईल फोन वापरत नसल्याने त्याचा माग काढण्यात अडचणी येत आहेत. पथके अजूनही आरोपीच्या मागावर असून, लवकरच आरोपी पोलिसांच्या जाळ्यात असेल,”
राजेंद्र पन्हाळे ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर पोलीस ठाणे)







